पनवेल तहसील कार्यालयाबाहेर शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:23 AM2017-12-09T02:23:15+5:302017-12-09T02:23:23+5:30
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसाठी शासनाकडे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला.
पनवेल : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसाठी शासनाकडे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांच्याबरोबर २५पेक्षा जास्त बैठका घेतल्या. मात्र, केवळ आश्वासनांवर बोळवण करून राज्य शासनामार्फत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांवर वारंवार अन्याय करण्यात आला. यामुळेच शुक्र वारी या शिक्षकांनी पनवेल तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. या वेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनीदेखील पाठिंबा दर्शविला.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक मागण्यांबाबत शासनदरबारी विनंत्या, अर्ज, निवेदन देऊनही शिक्षण विभाग व शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शासन गांभीर्याने विचार करणार नसेल, तर शिक्षक संघटना शासनाला जागे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिक्षक संघटनेने दिला होता. याकरिता महासंघाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिक्षकांकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आमदार बाळाराम पाटील यांनी या धरणे आंदोलनाला उपस्थित राहून शेकापचा पाठिंबा दर्शविला. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रश्न मांडू, असे आश्वासन दिले. पनवेल तालुक्यातून या आंदोलनामध्ये १०० शिक्षक सहभागी झाले होेते.
शिक्षकांचे हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सल्लागार प्रल्हाद वाघमारे, रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सहसचिव प्रा. श्यामसुंदर कीर्तने, पनवेल तालुकाप्रमुख प्रा. विजय शिरसाठ, प्रा. किशोर पाटील, प्रा. अनंत मुंढे, प्रा. बळीराम शिंदे यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.