अमेटी विद्यापीठाच्या विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:47 AM2018-05-20T02:47:56+5:302018-05-20T02:47:56+5:30
तीन तास ठिय्या : रोड बंद करण्याच्या कामाचा केला विरोध; सोमवारी बैठकीचे आयोजन
पनवेल : तालुक्यातील भाताण गावाशेजारी वसलेल्या अमेटी विद्यापीठाच्या विरोधात भाताण पाडा गावातील महिलांनी १७ मे रोजी आंदोलन पुकारले होते. ग्रामस्थांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर विद्यापीठाच्या माध्यमातून लोखंडी गेट बसविण्यात येणार असल्याने महिलांनी आंदोलनचे हत्यार उपसले होते. अखेर माजी आमदार विवेक पाटील व पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, सोमवार, २१ मे रोजी यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत भाताण हद्दीतील भाताण पाडा गावातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अमेटी विद्यापीठाने जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर गेट बसविण्यासाठी घेतलेले आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. तेटगुरे यांना देण्यात आले होते. १७ मे रोजी अमेटी विद्यापीठाने पोलीस बंदोबस्तात लोखंडी गेट बसविण्यास सुरु वात केली. याला गावातील महिलांनी जोरदार विरोध केला.
शेकडो महिला जवळपास ३ ते ४ तासांहून अधिक वेळ रणरणत्या उन्हात उभ्या राहून गेट बसविण्यास विरोध करत होत्या. या लोखंडी गेटमुळे गावातील नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ता कायमचा बंद होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या वेळी तालुका पोलीस ठाण्याचे व.पो.नि. मालोजी शिंदे, माजी आमदार विवेक पाटील, अमेटी विद्यापीठाचे उपाध्ये यांच्यात चर्चा झाली व सोमवारी यावर तोडगा काढण्याचे ठरले आहे. त्यामुळे महिलांचे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. तेटगुरे, जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, पंचायत समितीचे सदस्य काशिनाथ पाटील, माजी सरपंच नंदकुमार मुकादम, अनंता मुकादम, मधुकर मुकादम, सदस्य केशव गायकर, जनार्दन घरत, महिला आघाडीच्या प्रिया मुकादम यांच्यासह शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते.