मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे ओला कचरा निर्मितीचे नवी मुंबईतील सर्वांत मोठे केंद्र. येथून रोज ५० ते ६० टन कचरा तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर पाठविला जातो. या कचऱ्यातून महानगरपालिका खतनिर्मिती करते. बाजार समितीने कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा दोनवेळा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी झाला नाही. आता पुन्हा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. प्रस्तावित प्रकल्प यशस्वी झाला तर बाजार समितीमधील कचऱ्याचीही किंमत वाढणार असून त्यातून खत, वीज किंवा बायोगॅस निर्मिती शक्य होईल.
आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. वर्षाला १० ते १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल येथे होते. १ लाख नागरिकांना थेट रोजगार मिळताे. रोज मार्केटमध्ये ५० ते ६० टन कचरा निर्माण होतो. यामध्ये ४० ते ४५ टन ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. बाजार समितीमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीची सुविधा नसल्यामुळे हा कचरा पालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर पाठविला जाताे. पालिका या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करत आहे. या खताची ठेकेदाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विक्री केली जात आहे. बाजार समितीने स्वत:च कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे पालिका आयुक्तांनी सुचविले आहे.
ओल्या कचऱ्याची किंमत लक्षात घेऊन बाजार समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, बायोगॅस किंवा इतर कोणता प्रकल्प उभारता येईल. कोणता प्रकल्प बाजार समितीसाठी लाभदायक ठरेल. प्रकल्पासाठी किती जागा लागेल, खर्च किती येईल व त्यापासून किती उत्पन्न मिळेल याचा आढावा घेतला जाणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर कचऱ्याचीही किंमत वाढणार असून बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
२०११ चा प्रयोग फसला
बाजार समितीने २०११ मध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विस्तारित भाजी मार्केटचे उद्घाटन व वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते; परंतु यासाठी जागाच मिळाली नसल्यामुळे तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर बायोगॅस निर्मिती प्रकल्प तयार करण्याची चाचपणी करण्यात आली होती; पण तो प्रयोगही प्रत्यक्षात सुरू झाला नाही.
आता तिसऱ्यांदा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असून यावेळी तो प्रत्यक्षात साकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या मार्केटमधून किती कचरा?मार्केट दैनंदिन कचरा (टन) फळ मार्केट २० ते २५ भाजीपाला १५ ते २० कांदा ५मसाला ४धान्य ४