एमपीएससी उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; आयोगाच्या सचिव डॉ. खरात यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:55 IST2025-01-31T11:35:27+5:302025-01-31T11:55:13+5:30
राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सहा विभागांतील एकूण ८६९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. राज्यभरातून २ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

एमपीएससी उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; आयोगाच्या सचिव डॉ. खरात यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पारदर्शकपणे घेतल्या जाणार आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २ फेब्रुवारीला या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले आहे.
या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे उमेदवारांत गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खरात यांनी गुरुवारी परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला. प्रश्नपत्रिका बंदोबस्तात सुरक्षित ठेवल्या आहेत. काहींनी उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. त्या बदल्यात त्यांच्याकडून ४० ते ४५ लाख रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारी आहेत. यात कोणतेही तथ्य नसून प्रश्नपत्रिका सुरक्षित आहेत, असे त्यांनी सांगितले.
२ लाख ८६ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज आहेत. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सहा विभागांतील एकूण ८६९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. राज्यभरातून २ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे पोलिसांत तक्रार
या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपासही सुरू केला आहे. त्यामुळे उमेदवारांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेच्या तयारीला लागावे, असे आवाहनही खरात यांनी केले आहे.