नवी मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून उमेदवारांचे हॉलतिकीट चोरणाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो सायबर आणि डिजिटल सायन्सचा विद्यार्थी असून द्वितीय वर्षात शिकत आहे. डार्क नेटवरून मिळालेल्या ४०० डॉलरच्या सुपारीसाठी त्याने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे.
एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक झाल्याची घटना गतमहिन्यात घडली होती. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनुसार सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांनी सहायक निरीक्षकक सागर गवसणे, उपनिरीक्षकक आकाश पाटील, मोहन पाटील आदींचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी एमपीएससीची वेबसाईट हॅक करण्यासाठी वापरल्या गेलेल्या इंटरनेटद्वारे आयपीचा शोध घेतला. त्याद्वारे रोहित कांबळे (१९) यांच्यापर्यंत सायबर पोलिस पोहचले.
पुणेच्या चिखली येथे राहणारा रोहित सायबर अँड डिजिटल सायन्सचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी त्याने सायबर सिक्युरिटी, हॅकिंग यांचे कोर्स देखील केलेले आहेत. डार्कनेटच्या माध्यमातून तो काही हॅकर्सच्या संपर्कात होता. त्याच ठिकाणी त्याला एमपीएससीच्या वेबसाइटवरून प्रश्नपत्रिका व प्रवेशपत्र हॅक करण्याची ४०० डॉलरची सुपारी मिळाली होती. मात्र वेबसाईटवर केवळ प्रवेशपत्रिका असल्याने त्याने ९४ हजार प्रवेशपत्रिका चोरून त्या टेलिग्रामवरील ग्रुपवर टाकल्या होत्या. यामुळे सदर प्रकार उघड झाला होता.
त्याची आई शिक्षिका तर वडील पत्रकार आहेत. सायबर विषयात आवड असल्याने त्याने त्याच विषयात शिक्षण घेण्याचे ठरवले होते. दरम्यान तो हॅकर्सच्या संपर्कात आल्याने तो गुन्हेगारी मार्गाला लागला होता. त्याच्या महागड्या जीवनशैलीवरून त्याने यापूर्वी देखील काही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. याप्रसंगी सह आयुक्त संजय मोहिते, अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त प्रशांत मोहिते आदी उपस्थित होते.