बिल्डरांवर दाखल होणार एमआरटीपी
By admin | Published: January 5, 2016 03:03 AM2016-01-05T03:03:42+5:302016-01-05T03:03:42+5:30
शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतींमध्ये वाढीव बांधकाम केले आहे. त्यापैकी ९० टक्के इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही.
उल्हासनगर : शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतींमध्ये वाढीव बांधकाम केले आहे. त्यापैकी ९० टक्के इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. त्यामुळे तीन वर्षांतील इमारतींची चौकशी करून नियमबाह्य काम केलेल्या बिल्डरांवर एमआरटीपीअन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी नगररचना विभागाला दिले आहेत.
उल्हासनगरात बांधकाम नियम पायदळी तुडवून सर्रासपणे बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत. ९० टक्के इमारतींकडे बांधकाम पूर्णत्वासह जोता प्रमाणपत्र नाही. त्यामुळे कायदेशीर अडचणींमुळे इमारतींच्या सोसायट्या स्थापन करता येत नसल्याने, हजारो प्लॉटधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. बिल्डर आणि राजकीय नेत्यांच्या दबंगगिरीमुळे पालिका प्रशासन घाबरत आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी तीन वर्षांत उभ्या राहिलेल्या इमारतींना नोटिसा पाठवून पूर्णत्वाचा दाखला का घेतला नाही, याचा जाब विचारला आहे.
पालिका प्रभाग समितीनिहाय इमारतींची चौकशी होणार आहे. मंजूर नकाशानुसार इमारतीचे बांधकाम झाले नसल्यास, बिल्डरांसह वास्तुविशारदावर एमएमआरटीअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत, तसेच अशा बिल्डरांसह वास्तुविशारद, अभियंत्यांना काळ्या यादीत टाकण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. २०१३ पासूनच्या इमारतीची यादी तयार करून त्यांची चौकशी एका आठवड्यात होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.