भिवंडी : भिवंडी शहर परिसरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी खोदकाम केले आहे, तर काही ठिकाणी भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्त्यांवर अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत होत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
भिवंडीतील शांतीनगर येथील अमजदिया स्कूल ते नवी वस्ती या रस्त्यावर गणेश सोसायटी येथे खोदकाम केले आहे. त्यातच, दोन ते तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याने या रस्त्यावर अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर सुमारे अर्ध्या फुटापर्यंत चिखल साचला आहे. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहनचालकांची दुरवस्था झाली आहे. तर, महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरच साचलेल्या पाण्याच्या बाजूला चिखल साचला आहे. मात्र, याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
भिवंडीतील अंजूरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरही सध्या चिखल पसरला आहे. भिवंडी-ठाणे महामार्गावर अंजूरफाटा ते पूर्णा परिसरातील रस्त्यांवरही चिखल साचल्यामुळे नागरिकांसह प्रवासी व वाहनचालकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे हे दोन्ही रस्ते बीओटी तत्त्वावर असूनही या महामार्गाची दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपलेत काय, असा सवाल नागरिक करत आहेत.