मानवी तस्करीविरोधात मुक्ती बाइक चॅलेंज रॅली, आठ परदेशी रायडर्सचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:19 AM2018-11-04T03:19:46+5:302018-11-04T03:22:29+5:30
लहान मुले व महिलांचे समाजात होणारे लैंगिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आणि मानव तस्करी रोखण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी बंगळुरूहून मुंबईकडे मुक्ती बाइक चॅलेंज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई - लहान मुले व महिलांचे समाजात होणारे लैंगिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आणि मानव तस्करी रोखण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी बंगळुरूहून मुंबईकडे मुक्ती बाइक चॅलेंज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ओएसीस इंडिया हे या बाइक रॅलीचे आयोजक होते. हे या रॅलीचे दुसरे वर्ष असून, या बाइक रॅलीत आठ परदेशी, तर सात भारतीय रायडर्सचा समावेश होता. शनिवार, ३ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईत या रॅलीची सांगता झाली.
भारतात लहान मुले व महिलांच्या होणाऱ्या शोषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ओएसीस इंडिया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून मुक्ती बाइक चॅलेंज रॅलीचे आयोजन करण्यात येते. रॅलीच्या निमित्ताने २००० किलोमीटरचा प्रवास करीत सुमारे ४००० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, खेडेगाव तसेच नागरिकांची वर्दळ असणा-या विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्य आणि रॅलीतून, ‘शोषण थांबवा’, ‘बालमजुरी रोखा’, ‘लहान मुलांचा लैंगिक छळ थांबवा’, ‘बालविवाह थांबवा’ आदी संदेश देण्यात आले. ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात लहान मुलांची फसवणूक, बालविवाह, भीक मागायला लावणे, मानव तस्करीमध्ये जबरदस्तीने ढकलणे, अशा गोष्टी होतात, अशा भागांमधून रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे रॅलीचे मुख्य समन्वयक विश्वास उदगिरकर यांनी सांगितले. २७ आॅक्टोबर रोजी बंगळुरू येथील टाउन हॉल येथून या रॅलीस सुरु वात झाली. ती मैसूर-मंगळुरू-मुरु डेश्वर-धारवाड-सौंदत्ती-कोल्हापूर-मिरज-महाबळेश्वर-महाड, नवी मुंबई आणि ३ नोव्हेंबर रोजी मुंबई, असा प्रवास करण्यात आला. मुंबई सेंट्रल येथील सेंट अँथनी गर्ल्स स्कूल, नागपाडा येथे सांगता झाली. या रॅलीच्या सांगता सोहळ्यात ओएसीस इंडियाच्या कामाठीपुरा केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.