नवी मुंबई: शहरात दिव्यांगांसाठी देण्यात आलेल्या पब्लिक टेलिफोन बूथचे (पीसीओ) बहु-उपयोगिता केंद्रात रूपांतर करण्यास सिडकोने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर या बूथचे क्षेत्रफळ वाढविण्याबरोबरच आता त्यांचा ६0 वर्षांचा भाडेकरार करण्यास सिडकोने अनुकूलता दर्शविली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला सिडकोच्या संचालक मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह पनवेल आणि उरण तालुक्यातील शेकडो दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.
दिव्यांगांना स्वावलंबी होता यावे, त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, या दृष्टीने सिडकोने सुरुवातीच्या काळात दिव्यांगांना शहराच्या विविध भागात पब्लिक टेलिफोन बूथसाठी (पीसीओ) स्टॉल्स दिले होते. परंतु मोबाइल फोनचा वापर वाढल्याने पीसीओ ओस पडू लागले. त्यामुळे दिव्यांगांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. सार्वजनिक टेलिफोनचा व्यवसाय संपुष्टात आल्याने बूथमध्ये इतर व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी दिव्यांग बूथचालकांनी सिडकोकडे केली होती. मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. अखेर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.
सिडकोच्या नव्या धोरणानुसार दिव्यांगांना आपल्या बूथमध्ये आता झेरोक्स सेंटर, फुलांची विक्री, स्टेशनरी, शीतपेय, मिनरल वॉटर, सुक्या खाद्यपदार्थांची विक्री करता येणार आहे. त्याचप्रमाणे टूर्स व ट्रॅव्हल्स, संगणक व मोबाइल दुरुस्ती, वृत्तपत्रे व पुस्तकांची विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री आदी व्यवसाय करता येणार आहेत.
नवी मुंबई आणि पनवेल पालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांच्या सर्व केंद्रांचे त्वरित हस्तांतरण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या केंद्रांचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित महापालिकेच्या माध्यमातून सदर केंद्रांचे क्षेत्रफळ सध्याच्या ५१.६६ चौरस फुटावरून २00 चौरस फुटापर्यंत वाढविण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या हे केंद्र लिव्ह अॅण्ड लायसन्सवर दिले आहेत.