नवी मुंबई : गेल्या ७५ वर्षात मराठी उद्योजकांची आर्थिकदृष्ट्या किती प्रगती झाली, हा आता संशोधनाचा विषय आहे. मुंबई ही संपूर्ण देशाचा ३४ टक्के आर्थिक भार घेते. त्यामुळे मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशी येथे मराठी उद्योजक दिनी केले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्यावतीने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवार, १२ जुलै रोजी सायंकाळी मराठी उद्योजकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.
यावेळी मराठी उद्योजकांना मार्गदर्शनपर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांची चित्रफित दाखविण्यात आली. एव्हिट्रिक मोटर्स प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक मनोज पाटील, माने ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या संग्राम पाटील, डॉ.राजाराम पाटील आणि सुधीर राणे या मराठी उद्योजकांचा नारायण राणे यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला.