मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी २६३ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 05:00 AM2020-01-30T05:00:07+5:302020-01-30T05:00:15+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. माथाडीनेते शशिकांत शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल झाला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. दाखल केलेल्या अर्जांची गुरुवारी बाजार समितीमध्ये छाननी केली जाणार आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे. शेवटच्या दिवशी जवळपास ८२ जणांनी अर्ज दाखल केला आहे. ४३४ जणांनी अर्ज विकत घेतले होते. त्यापैकी तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्याच्या सहाही महसूल विभागामधून शेतकरी प्रतिनिधी अर्ज भरण्यासाठी चार दिवसांपासून मुंबईमध्ये येत होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बाजार समितीच्या चौथ्या मजल्यावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघनिहाय अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले होते.
बाजार समिती निवडणुकीमध्ये कामगार प्रतिनिधीसाठी माथाडीनेते शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात कोण अर्ज भरणार याविषयी उत्सुकता प्रत्येकात निर्माण झाली होती. माथाडी संघटना एकच उमेदवार देणार की कामगारांमध्ये फूट पडून दुसरा उमेदवारही उभा राहणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या दिवसापर्यंत कोणीच अर्ज भरला नसल्यामुळे शशिकांत शिंदे यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
छाननीसाठी विशेष व्यवस्था
बाजारसमिती निवडणुकीसाठी सादर केलेल्या अर्जांची गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी सुरू केली जाणार आहे. छाननीसाठी सर्व उमेदवार व सूचकांनाही उपस्थित राहवे लागणार आहे. जवळपास ५५० नागरिक छाननीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समिती मुख्यालयाच्या समोर तंबू टाकण्यात आला आहे. चौथ्या मजल्यावर छाननीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.