मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम

By Admin | Published: May 16, 2017 12:51 AM2017-05-16T00:51:13+5:302017-05-16T00:51:13+5:30

मुंबई अहमदाबाद हायवेवरील जुन्या वरसोवा पूलावरून किती टन वजनाच्या गाड्या जाऊ शकतात याच्या निश्चितीसाठी रविवारपासून पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात

Mumbai-Ahmedabad Highway Jam | मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम

मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : मुंबई अहमदाबाद हायवेवरील जुन्या वरसोवा पूलावरून किती टन वजनाच्या गाड्या जाऊ शकतात याच्या निश्चितीसाठी रविवारपासून पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल सुरु झाले आहेत. हा पूल चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहने मनोर नाका आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत.
जुन्या वरसोवा पूलाला तडे गेल्याने २४ डिसेंबर २०१३ पासून हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी एक गर्डर बदलून हा पूल वाहतूकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आॅक्टोबर २०१६ ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पूलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पूलावरून आॅक्टोबर महिन्यापासून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. त्यासाठी एकदिशा मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. एकेरी वाहतूक वीस मिनिटे सुरु ठेवली जात असल्याने सध्या याठिकाणी वाहतूक कोंडीने वाहनचालकांना त्रस्त केले आहे.
आता जुन्या पूलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात आले आहे. या पूलावरून किती वजनाची वाहने जाऊ शकतात याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी रविवारपासून चार दिवस पूलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या एकाच पूलावरून वाहतूक सुरु ठेवण्यात आल्यामुळे रविवारपासून मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सध्या अवज़ड वाहने मनोर आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत. असे असले तरी सध्या हायववेर दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.
दरम्यान, जुन्या पूलाला तडे गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ११ जून २०१४ पासून १५ टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनाही बंदीचेआदेश दिलेले आहेत. तरीही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप नेत्यांनी व स्थानिकांनी केला आहे.

Web Title: Mumbai-Ahmedabad Highway Jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.