नवी मुंबई - नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागले होते. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचं नाव असून दगडफेकीत रोहन गंभीर जखमी झाला होता. जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी (25 जुलै) मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात हिंसाचार करणाऱ्या ५६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामधील अनेक जण हे परप्रांतीय असल्याचंही समोर आलं आहे.
कळंबोलीत बंदला हिंसक वळण लागले, तर अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. यामध्येच रोहन तोडकर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारीपासून बंद करण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असे मेसेज कंपनीने आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत.