नवी मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या तेजस एक्स्प्रेसला आणखी एक विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतला आहे. विशेष म्हणजे या गाडीला अगोदरच एक विस्टाडोम कोच जोडलेली आहे. त्यात १४ एप्रिलपासून आणखी एका कोचची भर पडणार आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा या प्रवासात कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे.
मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्यांना विस्टाडोम कोच आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास सुखकर आणि निसर्गमय झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबई (सीएसएमटी) ते मडगाव ( गाडी क्रमांक २२११९//२२१२०) या तेजस एक्स्प्रेसलाही अगोदरच एक विस्टाडोम कोच आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार १४ एप्रिलपासून आणखी एक विस्टाडोम कोच वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोचची संख्या दोन होणार आहे.
'तेजस'ला दोन विस्टाडोम कोच
गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसी विस्टाडोम कोचला अधिक पसंती असते. कोकणातील नद्या, धबधबे, डोंगरदऱ्या आदींचा आनंद या कोचमधून प्रवास करताना मिळतो. विशेष म्हणजे तेजस एक्स्प्रेसला गेल्या वर्षी पहिला विस्टाडोम कोच बसविण्यात आला होता. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून १४ एप्रिलपासून आणखी एक विस्टाडोम कोच जोडला जाणार आहे. दोन विस्टाडोम कोच असणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील एकमेव गाडी ठरल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.