मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा खड्डेमय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:48 PM2019-07-15T23:48:10+5:302019-07-15T23:48:19+5:30
पावसाचा जोर वाढताच महामार्गासह शहरातील खड्ड्यांची संख्या आणि आकारही वाढत असल्याचे समीकरण दरवर्षी पहायला मिळते.
पनवेल : पावसाचा जोर वाढताच महामार्गासह शहरातील खड्ड्यांची संख्या आणि आकारही वाढत असल्याचे समीकरण दरवर्षी पहायला मिळते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. पनवेल परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर तारा, पळस्पे फाटा, ओएनजीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत आहेत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच चारचाकी वाहनांचेही नुकसान होत आहे.
पावसाळ्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावरील पळस्पे फाटा परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणाहून अवजड वाहनांचीही वर्दळ सुरू असल्याने दिवसन्दिवस खड्ड्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत.
कोकणवासीयांसाठी मुंबई-गोवा महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामार्गाची बरीच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच रुंदीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पावसाच्या सुरुवातीलाच महामार्ग खड्डेमय झाला आहे. सध्याच्या घडीला कर्नाळा, आपटा फाटा, तारा गाव आदी ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली पहायला मिळते. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वेग आपोआपच मंदावतो.
गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. त्यातच हा मार्ग खड्डेमय असल्यास अपघात होऊन कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची त्वरित डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
>खड्डे त्वरित भरण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
मुंबई-गोवा महामार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हे खड्डे त्वरित भरण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पोलादपूर शासकीय विश्रामगृहात अधिकारी व कार्यकर्त्यांशी पाटील यांनी चर्चा केली. गुजरातच्या धर्तीवर पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर क्रॅशबेअर्ससह खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी दिले. ग्रामीण रस्त्याबाबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील अटी व शर्ती सांगून ज्या गावातील लोकसंख्या एक हजाराच्या आत आहेत, त्या ठिकाणचे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ग करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
पनवेल महापालिका क्षेत्रासह, सिडको नोड, कळंबोली वसाहतीतही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पनवेल शहरातील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाºया रस्त्याचीही खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.