मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन, प्रवास केवळ साडेतीन तासांचा; प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:53 AM2023-09-07T06:53:55+5:302023-09-07T06:54:05+5:30
१.७० लाख कोटी खर्च, १३ जिल्ह्यांचा विकास सुसाट
- नारायण जाधव
नवी मुुंबई : आर्थिक राजधानी मुंबईहून उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत पोहोचता येणार आहे. या दोन मोठ्या शहरांना कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूरबुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. या मार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.
अहमदाबादनंतर राज्यांतर्गत हा पहिलाच बुलेट प्रकल्प असून, तो समद्धी महामार्गाला समांतर असा राहणार आहे. या मार्गाची लांबी ७६६ किलोमीटर असणार आहे. हा मार्ग ६८ टक्के समृद्धी महामार्गाला समांतर असून १,२६० हेक्टर जमिनीची गरज संपादित करावी लागेल. हा प्रकल्प राज्यातील अकरा जिल्ह्यांमधून जाणारा असून, याव्यतिरिक्त इतर १३ जिल्ह्यांना त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.
मुुंबई-नागपूर प्रकल्पाचा प्रस्ताव २०१९ मध्ये तयार करून २०२१ मध्ये त्याचा हवाई लीडार सर्वेक्षणदेखील केले होते. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ पासून या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्याला सुरुवात झाली. त्यानंतर तो मार्च २०२२ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर केला होता. आता बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
या बुलेट ट्रेन मार्गावर १३ स्थानके
या बुलेट ट्रेन मार्गावर १३ स्टेशन प्रस्तावित आहेत. यामध्ये मुंबई, शहापूर, इगतपुरी नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव जहाँगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या शहरांचा यामध्ये समावेश आहे.
दहा तासांचा वेळ वाचणार
सध्या जर आपण नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ पाहिला तर तो बारा ते पंधरा तास इतका लागतो; परंतु हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये हे अंतर कापता येणार आहे.
प्रतिकिमी २३२ कोटी रुपये खर्चाचा अंदाज
प्रकल्पाकरिता लागणारा खर्च हा एका किलोमीटरकरिता २३२ कोटी रुपये इतका येईल, असा अंदाज आहे. त्यानुसार एकूण एक लाख ७० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.
ठाणे जिल्ह्यातील मोठी जमीन होणार बाधित
ठाण्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन या प्रकल्पात जाणार आहे. तर मुंबई-नागपूर मार्गात नाशिकच्या पुढे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून ती न्यावी की नाही, यावरून राज्यकर्त्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांत अजूनही मतभेद आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातील उपरोक्त गावांव्यतिरिक्त कल्याणपुढील नाशिकपर्यंतची अनेक गावांची जमीन मुंबई-नागपूर मार्गात बाधित होणार आहे.