मुंबईकर चाखताहेत जुन्नरच्या हापूसची चव; कोकणचा हंगाम संपुष्टात 

By नामदेव मोरे | Published: June 3, 2024 05:36 PM2024-06-03T17:36:58+5:302024-06-03T17:38:50+5:30

१५ जूनपासून लंगडा दशेरीची आवक सुरू होणार.

mumbai people relish the taste of junnar hapus konkan hapus mango season ends  | मुंबईकर चाखताहेत जुन्नरच्या हापूसची चव; कोकणचा हंगाम संपुष्टात 

मुंबईकर चाखताहेत जुन्नरच्या हापूसची चव; कोकणचा हंगाम संपुष्टात 

नामदेव मोरे, नवी मुंबई : कोकणच्या हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. जुन्नर आंबेगाव मधील हापूसचा हंगाम सुरू झाला असून २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. १५ जूनपासून उत्तर प्रदेश मधील लंगडा व दशेरीची आवक सुरू होणार असून जुलै अखेरपर्यंत ग्राहकांना आंबा उपलब्ध होणार आहे.

कोकणच्या हापूसचा हंगाम संपत आल्यानंतर जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याची मार्केटमध्ये आवक सुरू होत असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुरूड जंजिरा, बाणकोट परिसरातील हापूसचा हंगाम संपुष्टात आला आहे. गुजरातमधील हंगामही दोन दिवसात संपुष्टात येणार आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागातून १२ हजार व इतर राज्यांमधून १३९३१ पेट्यांची आवक झाली आहे. जुन्नर, आंबेगाव परिसरातील हापूसचा हंगाम सुरू झाला आहे. प्रतिदिन जवळपास १० हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये जुन्नर हापूसला २०० ते ५०० रुपये डझन एवढा दर मिळत आहे. २० जूनपर्यंत हा हंगाम सुरू राहील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजार समितीमध्ये १५ जूननंतर उत्तर प्रदेश मधील लंगडा, दशेरी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे जुलैमध्ये ही ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.

प्रतिक्रिया-

बाजार समितीमध्ये जुन्नर, आंबेगाव परिसरातून प्रतिदिन १० हजार पेट्यांची आवक सुरू झाली आहे. हा हंगाम २० जूनपर्यंत सुरू राहील. यानंतर उत्तर प्रदेश मधील आंब्याची आवक सुरू होईल. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट

जीआय मानांकनासाठी पाठपुरावा-

भीमाशंकरच्या पट्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यामधील आंबा प्रत्येक वर्षी जूनमध्ये मार्केटमध्ये येतो. या परिसरातील आंब्याचे उत्पादन वाढत असून प्रत्येक वर्षी ५ हजार पेक्षा जास्त रोपांची लागवड होऊ लागली आहे. शिवकाळापासून हा आंबा प्रसिद्ध असल्यामुळे त्याला शिवनेरी आंबा नावाने जीआय मानांकन मिळावे यासाठी शेतकरी व लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.

Web Title: mumbai people relish the taste of junnar hapus konkan hapus mango season ends 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.