मुंबईतील पोलीस शिपायाचा सुपारी देऊन खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:39 AM2021-09-10T06:39:52+5:302021-09-10T06:40:18+5:30
महिला पोलिसासह दोघांना अटक : पनवेल रेल्वे स्टेशनबाहेर घडविला होता अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी सानप याला १५ ऑगस्टला पनवेल रेल्वे स्टेशनबाहेर कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हा अपघात नसून खून असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला पोलिसाने पूर्ववैमनस्यातून सुपारी देऊन हा अपघात घडविल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी एकूण तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मुंबईतील पोलीस शिपाई शीतल पानसरेसह उलवेत राहणारे विशाल जाधव व गणेश चव्हाण यांचा समावेश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला शिवाजी सानप काही महिन्यांपासून पुणे येथे वास्तव्याला गेला होता. तेथून बसने पनवेलला यायचा. पनवेलवरून ट्रेनने कुर्ला नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर हजर व्हायचा. १५ ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता पनवेल रेल्वे स्टेशनवरून मालधक्क्याकडे जात असताना अनोळखी वाहनाने त्याला धडक दिली. गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सानपची पत्नी व मेव्हणा यांनी या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सानपचा अपघात झाला नसून सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी सानपबरोबर मुंबई पोलीस दलात काम करणारी शीतल पानसरे व इतर दोन जणांना अटक केली. शीतल व सानप यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते. सानपविरोधात २०१९ मध्ये सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व २०१९ मध्येच विष्णूनगर, ठाणे येथे अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
सानपला धडा शिकविण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरून मैत्री झालेल्या धनराज जाधव याच्याबरोबर लग्न करून त्यालाही खून करण्याचा आग्रह धरला होता. पण त्याने नकार दिल्यामुळे तिने इतर दोन आरोपींना सुपारी देऊन खून केला.