जगभरातील प्रवाशांसाठी मुंबई महागडी
By admin | Published: June 18, 2015 01:15 AM2015-06-18T01:15:36+5:302015-06-18T01:15:36+5:30
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबापुरी जगातील पहिल्या पंचाहत्तर महागड्या शहरांमध्ये आहे. प्रवाशांसाठी जगातील महागड्या
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबापुरी जगातील पहिल्या पंचाहत्तर महागड्या शहरांमध्ये आहे. प्रवाशांसाठी जगातील महागड्या शहरांमध्ये पहिला क्रमांक लुआंडा या शहराने पटकवला आहे. तर भारतात मुंबई शहर प्रवाशांसाठी सर्वांत महागडे ठरले आहे. तर जगभरात मुंबईचा ७४ वा क्रमांक लागला.
प्रवाशांसाठी जगातील कोणते शहर महागडे आहे? यासाठी मर्सर या नावाजलेल्या संस्थेने ‘कॉस्ट आॅफ लिव्हिंग सर्वेक्षण’ केले. या सर्वेक्षणात जगातील कोणत्या शहरांत प्रवासी जास्त जातात, त्यांना किती खर्च येतो, अशी माहिती गोळा करण्यात आली. यात भारतात मुंबई महागडी असल्याचे आढळून आले.
आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय चलनात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना जगभरातील विविध देशांमध्ये फिरावे लागते. चलनातील चढउताराचा फटका या कंपन्यांनाही बसत आहे. पर्यायाने फिरस्तीच्या खर्चातही वाढ होत आहे. आर्थिक वृृद्धी, वस्तू आणि सेवा क्षेत्रातील महागाईमुळे मुंबई महागडे शहर बनले आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत होणारी वाढ, अन्नधान्यांच्या किंमती, सेवांच्या किंमतीतील चढा आलेख, विविध भाड्यांमध्ये होणारी वाढ या कारणांमुळे मुंबईकर नेहमीच त्रस्त असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
जगातील सर्वांत महागडी ५ शहरे
लुआंडा, हाँगकाँग, झ्युरिच, सिंगापूर, जिनेव्हा