मूकनाट्यात रंगणार मुंबईकर
By Admin | Published: March 22, 2016 02:41 AM2016-03-22T02:41:37+5:302016-03-22T02:41:37+5:30
प्रेक्षकवर्गासह बच्चेकंपनीला मूकनाट्याचा आनंद मिळावा, मूकनाट्याविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ‘माइम आर्ट कल्चर’ संस्थेने पुढाकार घेतला आहे.
महेश चेमटे, मुंबई
प्रेक्षकवर्गासह बच्चेकंपनीला मूकनाट्याचा आनंद मिळावा, मूकनाट्याविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ‘माइम आर्ट कल्चर’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘जागतिक मूकनाट्य दिना’चे औचित्य साधत संस्थेतर्फे मुंबईत पहिल्यांदाच मूकनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येणार असून, यानिमित्ताने रसिक प्रेक्षकांना मूकनाट्याचे प्रयोग मोफत पाहता येणार आहेत.
मूकनाट्य म्हणजे काय? ते कसे सादर करतात? याविषयीची माहिती देण्यासाठी संस्थेच्या वतीने मुलुंड येथे जनजागृती केली जात आहे. यानिमित्ताने मुलुंडमधील होली एंजेल शाळेच्या विद्यार्थ्यांसह ‘माइम आर्ट कल्चर’चे कुणाल मोटलिंग हे मूकनाट्याचे धडे उपस्थितांसमोर गिरवणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे मूकनाट्य कलाकार, दिग्दर्शक बाप्पी दास यांचा या कार्यशाळेत गौरव करण्यात येणार आहे. शिवाय पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने लघू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ‘मुकाभिनय’चे आयोजन करण्यात आले असून, रुईया , मनीबेन नानावटी महाविद्यालयातील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत.
नाटक, पथनाट्य एकांकिकांप्रमाणे मूकनाट्याला मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्शल मार्को यांनी आपले आयुष्य रंगवले. १९४० ते १९८० या कालावधीत मार्को यांनी मूकनाट्याच्या सादरीकरणात ‘मूनवॉक’चा प्रभावी वापर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मार्शल मार्को यांचा जन्मदिन...
‘जादूगार प्रत्यक्षात असलेल्या गोष्टी हातचलाखीने अदृश्य करतो आणि मूकनाट्य कलाकार हातचलाखीने अदृश्य गोष्टी सत्यात उतरवतो’, असे दिवंगत फ्रेंच आंतरराष्ट्रीय मूकनाट्य कलाकार मार्शल मार्को यांनी लिहून ठेवले आहे. मार्शल मार्को यांचा जन्मदिन जागतिक मूकनाट्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
२२ मार्च २०११ रोजी पहिला जागतिक मूकनाट्य दिन साजरा
जागतिक मूकनाट्य संघटनेच्या स्थापनेनंतर मूकनाट्य दिन साजरा करण्याचा प्रस्ताव २००४ साली मांडण्यात आला. मात्र काही कारणास्तव तो बारगळला. २००७ साली मार्को यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ मार्को यांचा जन्मदिन मूकनाट्य दिन साजरा करण्याबाबचा प्रस्ताव मांडण्यात आला. विशेष म्हणजे त्याला मंजुरीही मिळाली. २२ मार्च २०११ रोजी पहिला जागतिक मूकनाट्य दिन साजरा करण्यात आला. सद्य:स्थितीमध्ये भारतासह अमेरिका, स्वीडन, इस्रायल, इटली, हंगेरी, बल्गेरिया, फ्रान्स, बांगलादेश, सर्बिया,जॉर्जिया या देशांत उत्साहात मूकनाट्य दिन साजरा होतो.
> भारतात आणि विशेषकरून मुंबईत मूकनाट्यास पोषक असे वातावरण नाही. मूकनाट्याच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमे आणि सरकारच्या मदतीची आम्ही वाट पाहत आहोत. आंतरराष्ट्रीय मूकनाट्य महोत्सवात भारताने सादर केलेल्या निसर्गविषयक मूकनाट्याची जगभरात प्रशंसा झाली आहे. मूकनाट्याला लवकरच राजाश्रय मिळेल, अशी आशा आहे.
- बाप्पी दास, मूकनाट्य कलाकार, दिग्दर्शक