नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील आंब्याची आवक सुरू झाली आहे. बुधवारी पाच टन आंबा विक्रीसाठी आला असून, होलसेल मार्केटमध्ये ७०० ते ९०० रुपये किलो दराने विक्री झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हा आंबा १ हजार ते १२०० रुपये किलो दराने विकला जात आहे.
गतवर्षीच्या आंबा हंगामामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही फळांची आवक कमीच होत असताना, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व अफ्रिकेतील मलावी देशातील आंबा विक्रीसाठी मुंबईत येऊ लागला आहे. आंब्याची आवक सुरू झाल्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी १,५०० बॉक्स विक्रीसाठी आले असून, प्रत्येक बाॅक्स साडेतीन किलोचा आहे. ७०० ते ९०० रुपये किलो दराने या आंब्याची विक्री सुरू असून, १० डिसेंबरपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे.
मलावी हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील छोटासा देश आहे. १९६४ पर्यंत ब्रिटिश वसाहत म्हणून तो ओळखला जात होता. ६ जुलै, १९६४ला देश स्वतंत्र झाला. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचे वातावरण कोकणासारखे आहे. तेथील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये कोकणातील दापोलीमधून हापूस आंब्याची कलमे मलावीमध्ये नेली. १,७०० एकर जमिनीवर हापूसच्या कलमांची लागवड केली आहे. मागील काही वर्षांपासून हा आंबा विक्रीसाठी भारतात येत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोकणातील हापूस आंब्याची कलमे २०११ मध्ये मलावीमधील शेतकऱ्यांनी त्यांच्या देशात नेऊन लागवड केली होती. मलावी आंबा प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी भारतात येत असतो. या वर्षी दिवाळीमध्ये हा आंबा उपलब्ध झाल्यामुळे व त्याची चवही हापूसप्रमाणे असल्यामुळे ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - संजय पानसरे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती