मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
By नामदेव मोरे | Published: September 20, 2024 05:36 AM2024-09-20T05:36:31+5:302024-09-20T05:36:46+5:30
या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल व मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : ‘फळांच्या राजा’चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला. मुंबईकरांनी तब्बल १ लाख २४ हजार ३८ टन आंबा फस्त केला असून, यातून ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल व मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीच्या नियमित हंगामापूर्वी ६ नोव्हेंबरला कोकणातून हापूसची पहिली पेटी दाखल झाली होती. यानंतर काही दिवसांमध्ये मलावी हापूसचीही आवक सुरू झाली होती. पहिली पेटी लवकर आली असली तरी नियमित आंब्याची आवक फेब्रुवारीपासून सुरू झाली. २०२३ मध्ये फेब्रुवारीमध्ये १८०८ टन आवक झाली होती. २०२४ मध्ये ती २५६६ टनांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक ३८ हजार ७७८ टन आवक झाली होती. ग्राहकांना ऑगस्टअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होता.
मुंबई बाजार समितीमध्ये हंगामामध्ये १ लाख २४ हजार ३८ टन आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये कोकणसह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील विविध प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. हापूस, पायरी, बदामी, लालबाग, चौसा व इतर सर्व प्रकारचा आंबा मार्केटमध्ये दाखल झाला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील ग्राहकांसह येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही करण्यात आली.
या वर्षी हंगाम ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होता. यामुळे ग्राहकांना आंब्याचा आस्वाद घेता आला. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा मलावीमधील आंबा ग्राहकांना उपलब्ध होईल.
- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
आंबा हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. वाहतूककोंडी व इतर समस्या होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. हंगाम उत्तम पद्धतीने पार पडला.
- संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट