मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:28 AM2022-11-27T10:28:57+5:302022-11-27T10:29:33+5:30
८०० बॉक्स दाखल : आफ्रिकन देशात जगविली कोकणातील कलमे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा शनिवारी मुंबईच्या बाजारात दाखल झाला. पहिल्या टप्प्यात ८०० बॉक्सची आयात झाली असून, पुढील दोन आठवडे त्याची आवक राहणार आहे. यामुळे मुंबईकरांना नोव्हेंबरमध्येच आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.
साधारणत: दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मलावी देशाचे हवामान कोकणाप्रमाणे आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये कोकणातून आंब्याची कलमे नेऊन जवळपास ४५० एकर जमिनीवर आंब्याची बाग फुलवली आहे. कोकणातील हापूसची नियमित आवक फेब्रुवारीपासून सुरू होते. परंतु, मलावीचा आंबा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येतो. गतवर्षी १५ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली होती. यावर्षी २६ नोव्हेंबरला ८०० बॉक्सची आवक झाली. एक बॉक्समध्ये ८ ते १६ आंबे असून, ३,५०० ते ५ हजार रुपये दराने त्याची विक्री अपेक्षित आहे.
फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, कोकणातील हापूसची कलमे नेऊन मलावीमध्ये बाग तयार केली आहे. साधारणत: दोन आठवडे या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असून, ग्राहकांना डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो उपलब्ध होणार आहे.