मुंबईकरांना कांदा पुन्हा रडवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:50 AM2018-10-25T05:50:26+5:302018-10-25T05:50:28+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक ५० टक्क्यांनी घटली आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे दर वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा १५ ते २४ रुपये व किरकोळमध्ये २० ते २८ रुपये दराने विकला जात आहे. मुंबईमध्ये प्रतिदिन दोन हजार टन कांद्याची गरज असते. पण सद्य:स्थितीमध्ये उन्हाळी कांद्याचा साठा कमी होत असून, नवीन पीक बाजारात न आल्याने कांदाटंचाई भासत आहे. दोन दिवसांपासून कांद्याची आवक ५० टक्के कमी झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये नाशिक, पुणे व इतर ठिकाणांवरून १०९२ टन कांदा विक्रीसाठी आला आहे. काही प्रमाणात कर्नाटकवरूनही कांदा विक्रीस आला असून ते प्रमाण कमी आहे. चार ट्रक नवीन कांदाही विक्रीला आला आहे. पुढील एक महिना नवीन कांदा मार्केटमध्ये पुरेशा प्रमाणात येणार नसल्यामुळे भाव तेजीत राहतील, अशी माहिती व्यापारी प्रतिनिधी अशोक वाळुंज यांनी दिली.