नवी मुंबई : कोकणच्या हापूसचा हंगाम संपला असला तरी मुंबई बाजार समितीमध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक, जुन्नरमधून आंब्याची आवक सुरूच आहे. प्रतिदिन ९०० टनांपेक्षा जास्त आंबा विक्रीसाठी येत असून, यामध्ये जुन्नरचा हापूस, लंगडा, बदामी, तोतापुरी, दशेरीचा समावेश असून, यावर्षीही मुंबई, नवी मुंबईकरांना १५ ऑगस्टपर्यंत आंब्याची चव चाखता येणार आहे.
मुंबईच्या फळ बाजारामध्ये शुक्रवारी १,६५४ टन फळांची आवक झाली असून, यामध्ये ९३६ टन आंब्याचा समावेश आहे. सद्य:स्थितीत कोकणातील हापूसचा हंगाम संपला आहे. जुन्नर हापूसच्या ५ ते ६ हजार पेट्यांची रोज आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये ३०० ते ६०० व किरकोळ मार्केटमध्ये ५०० ते १,००० रुपये डझन दराने विक्री होत आहे. जूनअखेरपर्यंत जुन्नरच्या आंब्याची आवक सुरू राहणार आहे. उत्तर प्रदेशमधून दशेरी व लंगडाची आवक होत आहे, तर कर्नाटकातून हापूस, बदामी व तोतापुरी आंब्याची आवक होत आहे. लवकरच चौसाचीही आवक होणार असून, १५ ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
फळांची आवक घटली
बाजार समितीमध्ये सर्वच फळांची आवक कमी झाली आहे. शुक्रवारी ११५ टन अननस, २ टन अंजीर, १२ टन चेरी, २५ टन डाळिंब, ९८ टन कलिंगड, ३३ टन लिची, ७९ टन मोसंबी, ६ टन जांभूळ, १५१ टन पपई, ७ टन पेरू, १ टन पिच, ६३ टन प्लम, ५ टन सीताफळ, ७८ टन खरबूज व २४ टन मक्याची आवक झाली.
बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरूच आहे. जुन्नर हापूस, दशेरी, लंगडा, बदामी, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. यावर्षीही १५ ऑगस्टपर्यंत ग्राहकांना आंबा उपलब्ध होईल. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट