- सुलक्षणा महाजन
शाळेत असल्यापासून मला मुंबईचे आकर्षण होते ते येथे असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक स्वातंत्र्याचे. विशेषत: मुलींनी धाकातच राहिले पाहिजे किंवा साडीच नेसायला पाहिजे अशी पारंपरिक शिस्त येथे पाळावी लागणार नाही याची जाणीव मला येथे शिकायला येण्यापूर्वीपासून होती. तसा मुक्ततेचा अनुभव होस्टेलमध्ये राहिल्यावर आलाही; परंतु त्याचबरोबर मुंबईमध्ये एक प्रकारची शिस्त असते आणि ती आवश्यक असते हेही उमजायला लागले.
शिस्त दोन प्रकारची असते. एक म्हणजे स्वयंशिस्त आणि दुसरी म्हणजे नागरी शिस्त. रात्री बरोबर आठच्या ठोक्याला वसतिगृहाचे प्रवेशदार बंद होत असे. सकाळचा नाश्ता सात ते आठ आणि रात्रीचे जेवण आठ वाजता. ही वेळ चुकली की उपासच घडायचा. बस नाही तर लोकल चुकली की कॉलेजचे तास बुडायचे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या शिस्तींचे महत्त्व कळले. घड्याळाच्या शिस्तीप्रमाणे मुंबईमधील अनेक विभागांना, वस्त्यांनाही नगररचना शिस्त असल्याचे लक्षात आले. आमचे वसतिगृह ज्या मरिन ड्राइव्हवर होते, त्या संपूर्ण भागाला एक देखणी शिस्त होती. येथील प्रत्येक इमारत सर्वसाधारणपणे एकाच उंचीची होती. प्रत्येक इमारतीचा भूखंड समान आकाराचा होता, त्यामध्ये इमारती बांधताना आजूबाजूला मोकळी सोडलेली जागा समान होती. लांबून त्यातील शिस्त दिसत असे तर जवळून त्यांची खासियत. जवळून बघितले तर प्रत्येक इमारत वेगळी होती. त्यांच्या बाल्कनीचे सज्जे, खिडक्यांचे आकार, जिने आणि खोल्यांची मांडणी, बाह्य भिंतींवर असलेली नक्षी, रंग अशा अनेक बाबतींत प्रत्येक इमारत विशिष्ट असूनही त्या सर्व नागरी इमारतींना एक शिस्त होती. कुशल हातांनी बनवलेल्या मोत्याच्या माळेसारखीच शान ह्या राणीच्या गळ्यातील माळेला आली होती ती ह्या सामूहिक आणि सार्वजनिक शिस्तीच्या नागरी घडवणुकीमुळे. अशीच शिस्त शिवाजी पार्क, पारशी कॉलनी, हिंदू कॉलनी येथेही दिसत असे. बेलार्ड इस्टेटमध्ये बहुतेक सर्व दगडी, कार्यालयीन वापराच्या इमारती अशाच नागरी शिस्तीमध्ये घडलेल्या होत्या. हॉर्निमन सर्कलच्या भोवती असलेल्या गोलाकार दगडी इमारतींच्या देखण्या कमानी आणि त्यांच्या शिरोभागी असलेली एशियाटिक वाचनालयाची भव्य खांब आणि पायऱ्या असलेली इमारत, फोर्टमधल्या बँकांच्या इमारती संपूर्ण दक्षिण मुंबईची शान आणि श्रीमंती थाट वाढविणाºया होत्या. रुंद रस्ते, त्यामधील गोल हिरवी वाहतूक वर्तुळे, हिरवे बगिचे आणि मैदाने, स्टेशनची, महापालिका आणि मध्यवर्ती पोस्टाची इमारत ह्या सर्वांना ब्रिटिश परंपरेतून आलेली एक स्वयंभू नागरी शिस्त होती.
याउलट आमच्या वसतिगृहाच्या मागे असलेला भाग म्हणजे गिरगाव. अतिशय दाटीवाटीने बांधलेल्या इमारतींचा, अरुंद गल्ली-बोळ असलेला. येथे इमारती बांधताना कोणतेही नागरी वसाहतीचे नियम अस्तित्वातच नव्हते. कारण हा सर्व स्थानिक लोकांची वस्ती असलेला विभाग भारतीय पारंपरिक व्यवस्थेनुसार रचना असलेला होता. कोठे वाड्या होत्या तर कोठे भुलेश्वर, नळबाजारासारखे दुकानदारीने गजबजलेले रस्ते होते. मध्येच देवळे, मशिदी आणि पारशी अग्यारीही दिसत. त्यांनाही पन्नास वर्षांपूर्वी एक सामायिक शिस्त होती. तेव्हा येथील इमारतीही सहसा सारख्या उंचीच्या, चार-पाच मजली होत्या. विकास नियम तेव्हा अस्तित्वात नसूनही मानवी हालचालींवर असलेली नैसर्गिक मर्यादा आणि बांधकाम तंत्रज्ञानाला असलेली ऊर्जेची मर्यादा यामुळे त्यात एक शिस्त होती. तेव्हा माणसांना वरच्या मजल्यावर स्वत:च्या पायानेच चालत जावे लागे आणि पाण्याचे पंप नसल्याने विशिष्ट उंचीपर्यंतच इमारतींमध्ये पाणी पोचत असे. शिवाय इमारतींमधील सामायिक संडास आणि मैलापाणी व्यवस्था यावरही मर्यादा होत्या. सहसा लाकूड, विटा आणि क्वचित लोखंड किंवा सिमेंट यांमुळे बांधकामाच्या उंचीवर मर्यादा होत्या. येथील शिस्त जरी नियोजनातून आलेली नसली तरी नैसर्गिक मर्यादांमुळे कमी-जास्त प्रमाणात का होईना ती आपोआप आलेली होती.