विहिरींच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:25 AM2018-07-31T03:25:08+5:302018-07-31T03:25:17+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची दुरवस्था झाली आहे. विहिरींमध्ये शेवाळ साचले असून झुडपे वाढू लागली आहेत.
- अनंत पाटील
नवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची दुरवस्था झाली आहे. विहिरींमध्ये शेवाळ साचले असून झुडपे वाढू लागली आहेत.
नवी मुंबईत बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागाच्या कार्यक्षेत्रात विहिरींची एकूण संख्या ९४ आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या विहिरींच्या साफसफाई आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विहिरींना शेवाळ आणि पानफुटी तसेच जंगली झाडांच्या लहान-मोठ्या फांद्यांनी अक्षरश: विळखा घातलेला आहे. दिघा परिसरातील अनेक विहिरींची दुरवस्था झाली असून तीच परिस्थिती घणसोली विभागात आहे.सर्वाधिक विहिरींची संख्या घणसोली गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात आहेत. पावसाळ्यापूर्वी विहिरीची साफसफाई केल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला तरी आता अनेक विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ आणि झाडांनी विळखा घातल्यामुळे विहीर आहे की डबके अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतरच विहिरींच्या साफसफाईच्या कामाला ठेकेदारामार्फत सुरु वात केली जाते. तर अनेकदा तक्र ारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. घणसोली येथे ब्रिटिश राजवटीपासून कार्यरत असलेल्या गुणाले तलावासमोरील वाहतुकीच्या रस्त्यालगत असलेली विहीर, बौध्दवाडी येथील तीन बावडी, गुणाले तलावाच्या मध्यभागी असलेली विहीर आणि घणसोली (चिंचआळी) येथे असलेल्या विहिरींची पार दुर्दशा झालेली आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील येत्या आठवड्यात पाहणी करून दुरवस्था झालेल्या किंवा विहिरींची साफसफाई तसेच आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई केली होती, अशी माहिती कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली आहे.
विहिरींची आकडेवारी : बेलापूर ८, नेरूळ १२, तुर्भे १२, वाशी ३, कोपरखैरणे १३, घणसोली २१, ऐरोली १७ , दिघा ८