पालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:04 AM2020-02-19T02:04:01+5:302020-02-19T02:04:08+5:30

प्रकल्प उभारण्यात अपयश : जुन्याच योजनांचा अंदाजपत्रकात समावेश

Municipal ambitious projects again on paper | पालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा कागदावरच

पालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा कागदावरच

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षीच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात अपयश आले आहे. वर्षानुवर्षे अर्थसंकल्पात नावापुरत्याच महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला जात असून त्या नक्की कधी पूर्ण केल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०२०-२१ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये अपवाद वगळता सर्व जुन्याच योजनांचा समावेश करण्यात आला आहे. योजना त्याच फक्त त्यावरील खर्चाच्या आकड्यांमध्ये बदल करण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये गवळी देव परिसरामध्ये निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करणे, मोरबे धरण परिसरामध्ये पीपीपी योजनेअंतर्गत पर्यटनस्थळ विकसित करणे. धरण परिसरामध्ये व डम्पिंग ग्राउंडवर वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याच्या योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला होता. परंतु या योजना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत. नेरूळमध्ये सायन्स पार्कची उभारणी करणे. जुुईनगरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधणे, महापालिकेने नेरूळ, वाशी व ठाणे-बेलापूर रोडवर पादचारी पूल बांधणे. वाशी, ऐरोली व महापेमध्ये भुयारी मार्ग बांधणेही अर्थसंकल्पात प्रस्तावित केले होते. परंतु ते प्रकल्पही प्रत्यक्षात येऊ शकलेले नाहीत. नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये सायन्स पार्क उभारणे प्रस्तावित आहे. यासाठी अनेक वर्षांपासून तरतूद करण्यात येत आहे. गतवर्षी त्यासाठी निविदा प्रक्रिया, सल्लागार नियुक्तीही करण्यात आली होती. पण अद्याप तो प्रकल्प सुरू झालेला नाही. महापुरुषांच्या नावाने भवन बनविण्याची योजनाही दहा वर्षांपासून प्रलंबित आहे.

महापालिका प्रत्येक वर्षी आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करत असते. महापालिकेने यापूर्वी बांधलेल्या ऐरोली, नेरूळ व बेलापूर रुग्णालय पूर्णक्षमतेने सुरू करण्याची घोषणा केली होती. पण ही रुग्णालये सुरू करणे शक्य झालेले नाही. आरोग्य विभागामध्ये डॉक्टर व इतर कुशल कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कर्मचारी कमी असल्यामुळे शहरवासीयांना आवश्यक त्या सुविधा देता येत नाहीत. प्रत्येक अर्थसंकल्पातील चर्चेच्या वेळी आरोग्याच्या विषयावरून नगरसेवक प्रशासनास धारेवर धरतात. पण प्रत्यक्षात आश्वासनांशिवाय काहीही होत नाही. क्रीडा विभागासाठी महापालिकेने यापूर्वी केलेल्या घोषणाही हवेत विरल्या आहेत. वाशीमध्ये आॅलिम्पिक दर्जाचा तरण तलाव उभारण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून अर्थसंकल्पात त्याविषयी तरतूद करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात तरण तलावाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. घणसोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणाच्या कामाचीही फक्त घोषणा होत असून प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. पुढील वर्षभरात ही कामे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मालमत्ता कर घोटाळ्याविषयी संभ्रम कायम

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामध्ये घोटाळा झाल्याचा मुद्दा तीन वर्षांपूर्वी राज्यभर गाजला होता. तत्कालीन आयुक्तांनीही अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये मालमत्ता कर विभागातील अनागोंदी कारभारामुळे जवळपास एक हजार कोटींच्या दरम्यान पालिकेचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आणून दिले होते. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. जवळपास ५०० कोटींच्या नुकसानीविषयी गुन्हाही दाखल झाला होता. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना याविषयी पत्रकार परिषदेमध्ये माहिती विचारली असता या प्रकरणी लाचलुचपत विभागाने जी माहिती मागितली होती ती त्यांना देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. परंतु प्रत्यक्षात घोटाळा झाला की नाही याविषयी संभ्रम मात्र अद्याप कायम आहे.

वर्षभरामध्ये पूर्ण न झालेल्या योजना
च्घणसोली ते ऐरोली दरम्यान उड्डाणपूल बांधणे
च्दिवाळे येथे कोल्डस्टोरेजसह मासळी मार्केट उभारणे
च्मौलाना आझाद, मदर तेरेसा, सेवालाल व महात्मा बसवेश्वर भवन उभारणे
च्विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारणे
च्श्वान नियंत्रण केंद्राची व पशुवैद्यकीय रुग्णालयाची उभारणी
च्पाळीव श्वान उद्यान व पक्षी-प्राणिसंग्रहालय उभारणे
च्डेब्रीज प्रक्रिया, कचºयापासून खत व वीजनिर्मिती केंद्र उभारणे
च्तरण तलाव, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल व इनडोअर स्टेडियम उभारणे
च्मोरबे धरण परिसरामध्ये थीम पार्क, सोलर प्रकल्प व विद्युत प्रकल्प उभारणे
च्नेरूळ, वाशी व ठाणे-बेलापूर रोडवर पादचारी पूल बांधणे
च्वाशी, ऐरोली व महापेमध्ये भुयारी मार्ग बांधणे
च्गवळी देव पर्यटनस्थळ विकसित करणे
च्जुईनगरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधणे
च्ऐरोली, नेरूळ व सीबीडी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात अपयश

वर्षभर केलेली कामे पुढीलप्रमाणे
च्शहाबाज येथील जुने कर्मचारी निवासस्थान तोडून नवीन बांधण्याचे काम सुरू
च्नेरूळ सेक्टर १९ मध्ये स्केट पार्कचे काम करण्यात आले आहे
च्ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे स्मृतिवन विकसित करण्याचे काम पूर्णत्वास
च्शहरातील मूळ गावांच्या बाहेर प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू
च्विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण
च्यादवनगरमध्ये २२०० विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू
च्राजर्षी शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर रबाळे येथे ५० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
च्एमआयडीसी परिसराला मोरबेच्या जलवाहिनीवरून पाणी उपलब्ध करून देण्याचे काम अंतिम टप्प्यात
च्दिवाबत्ती कामाअंतर्गत शहरातील उर्वरित ठिकाणी १५५७ नवीन दिवाबत्तीचे खांब लावण्यात आले आहेत.
 

Web Title: Municipal ambitious projects again on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.