कळंबोली : पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल अडीच वर्षांनी समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या कमानी काढून त्याठिकाणी महापालिकेचे नामफलक लावण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. सध्या हे काम प्रगतिपथावर असून अद्याप काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या काळातील जुनेच नामफलक आहेत.पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबर २0१६ मध्ये स्थापना करण्यात आली. यामध्ये पनवेल शहर, सिडको वसाहती आणि २९ महसुली गावांचा समावेश करण्यात आला. यात २३ ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. आपल्या कार्यकाळात संबंधित ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी आपल्या कमानी उभारल्या होत्या. त्यावर संबंधित ग्रामपंचायती व ग्रुप ग्रामपंचायतीच्या नावाचा उल्लेख होता. खारघर तसेच कामोठे परिसरात अशा प्रकारच्या कमानी दिसून येतात. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेने ग्रामपंचायतीची कार्यालये तसेच इमारती ताब्यात घेतल्या. याच कार्यालयातून महापालिकेचा कारभार सुरू करण्यात आला. परंतु मागील अडीच वर्षांत जुन्या ग्रामपंचायतीचे लागलेले फलक व कमानी काढण्याचा मात्र महापालिका प्रशासनाला विसर पडला. अखेर महापालिकेला यासंदर्भात आता जाग आली असून ग्रामपंचायतीच्या नावे असलेले फलक व कमानी काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आता अनेक ठिकाणी जुन्या ग्रामपंचायतींच्या नावाऐवजी महापालिकेचे फलक दिसू लागले आहेत. दरम्यान, काही गावातील कमानी बदलण्याचे काम अद्याप शिल्लक आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.देहरंग धरणावर नगरपरिषदचपनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतरही देहरंग धरण परिसरात आजही पनवेल नगरपरिषदेचे फलक दिसत आहे. त्यामुळे महापालिका झाली तरी हे धरण नगरपरिषदेच्या मालकीचे आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कमानीवर महापालिकेचे नामफलक; अडीच वर्षांनंतर प्रशासनाला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:01 AM