नवी मुंबई : महानगरपालिकेने स्मशानभूमी व्हिजन राबवून शहरातील २९ स्मशानभूमींची सुधारणा केली होती; परंतु योग्य देखभाल न केल्यामुळे अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. अस्वच्छता व इतर समस्यांचे पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले असून, नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये २९ स्मशानभूमी असून, त्यापैकी १२ मध्यवर्ती स्मशानभूमी आहेत. स्मशानभूमींच्या दुरवस्थेविषयी नागरिक व लोकप्रतिनिधींनी वारंवार नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने स्मशानभूमी व्हिजन राबविले. एकाच वेळी सर्व स्मशानभूमींची दुरुस्ती करण्यात आली. देखभालीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली; परंतु ठेकेदाराकडून योग्यपद्धतीने देखभाल केली जात नसल्याची टीका नगरसेवकांनी केली. बेलापूर, नेरुळ, वाशी व तुर्भे विभागातील स्मशानभूमींच्या देखभालीसाठी ६३ लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. नगरसेविका सरोज पाटील यांनी बेलापूरमधील स्मशानभूमीमधील प्रसाधनगृहाची स्वच्छता ठेवली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. डॉ. जयाजी नाथ यांनीही अस्वच्छतेविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सुनील पाटील यांनी स्मशानभूमीमध्ये ठेकेदाराने नियुक्त केलेले कर्मचारी उपलब्ध नसतात. दारावे स्मशानभूमीचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्याचे स्पष्ट केले. वाशीतील नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी मनपा क्षेत्रात इलेक्ट्रिक शवदाहिनीची गरज आहे. प्रशासनाने अशा प्रकारची शवदाहिनी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. प्रशासनाने मांडलेल्या ६३ लाख रुपयांच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून चार विभागामधील स्मशानभूमीमध्ये वर्षभर बर्निंग स्टॅण्डची देखभाल करणे व सर्व प्रकारची दुरुस्ती अपेक्षित आहे.