नवी मुंबई : सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीत सत्ताधारी राष्ट्रवादीला नाट्यमयरित्या पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे शिवराम पाटील यांनी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार यांचा एका मताने पराभव करून महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्वत:कडे खेचून घेतल्या. या पराभवामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.सभापती पदाची निवडणूक घोषित होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अपर्णा गवते यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे एखादे हक्काचे मतदान विरोधात गेल्यास सभापतीपद गमावण्याची भीती राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना होती. याकरिता त्यांनी काँग्रेसच्या सदस्या मीरा पाटील यांना विश्वासात घेत गवते यांच्या जागी नव्या सदस्याच्या नियुक्तीकरिता तातडीची महासभा लावली होती. परंतु या तातडीच्या महासभेवर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने नगरविकास विभागाने सदर महासभेला स्थगिती दिलेली. त्यानंतरही सोमवारी स्थायी समितीच्या दोन तास अगोदर सकाळी १० वाजता विशेष महासभा घेण्यात आली. यामध्ये स्थायी समितीच्या रिक्त जागेवर नगरसेवक प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली.स्थायी समिती बैठकीत सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांनी पीठासीन अधिकारी रायगड जिल्हाधिकारी शीतल उगले यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यावरून जिल्हाधिकारी उगले यांनी नियमांच्या आधारे नवनियुक्त सदस्य प्रकाश मोरे यांना मतदानाच्या प्रक्रियेतून बाहेर काढले. ज्या सदस्यांना तीन दिवस कार्यक्रम पत्रिका मिळाली असेल त्यांनाच मतदानाचा अधिकार बजावता येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थायी समिती सभागृहात राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे आठ, तर शिवसेना-भाजपा युतीचे सात सदस्य राहिले होते. त्यांच्यात सभापती पदासाठी मतदान झाले असता काँग्रेसच्या सदस्या मीरा पाटील यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार जयवंत सुतार यांच्याऐवजी शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांना मतदान केले. त्यामुळे काँग्रेसच्या अवघ्या एका मतामुळे महापालिका तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे गेल्या आहेत. मीरा पाटील ह्या राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे हेरून शिवसेना व भाजपाचे स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात होते. त्यांनी मीरा पाटील यांना दोन दिवस गुप्त ठिकाणी ठेवले होते, अशी चर्चा आहे. स्थायी समितीवर शिवसेनेचा विजय होताच खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी नवनियुक्त सभापती शिवराम पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.शासनाकडून स्थगिती मिळालेली असतानाही महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी विशेष महासभा भरवण्यासाठी बराच आटापिटा केला. यावरून विरोधकांनी महासभेत बाविस्कर यांना धारेवर धरले असता, महापौरांच्या अधिकारातून सभा भरवल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका तिजोरीच्या चाव्या सेनेकडे
By admin | Published: May 10, 2016 2:13 AM