नवी मुंबई : स्वच्छ तीर्थ मोहिमेंतर्गत प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतांतर्गत नेरुळ विभागातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी प्रार्थनास्थळे आणि परिसरात अभियान राबविण्यात आले.
देशात स्वच्छतेत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविल्यावर आता पहिला क्रमांक पटविण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चय केला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या उपस्थितीत स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी स्वच्छ तीर्थ मोहिमेंतर्गत नेरुळमधील प्रार्थनास्थळांच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
नेरुळमधील माता अमृतानंदमयी मठ, बालाजी मंदिर, शनिमंदिर, आयप्पा मंदिर, दत्त मंदिर, प्रबुद्ध बुद्ध विहार, गुरुद्वारा विभागातील आदी सर्वच प्रार्थनास्थळे आणि परिसरात स्वच्छता केली. यावेळी देशात स्वच्छतेत नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कामगिरीबाबत इंगळे यांनी नागरिकांना माहिती दिली. नवी मुंबई शहर कायम स्वच्छ ठेवण्याचे तसेच स्वच्छतेत नवी मुंबई शहराला देशात पहिल्या स्थानावर नेण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. यावेळी नेरुळ विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे, स्वच्छता निरीक्षक अरुण पाटील, जयश्री आढळ, अजित तांडेल, नीलेश पाटील, वीरेंद्र पवार, भूषण सुतार व पर्यवेक्षक अनंत मढवी आदी सफाई कामगार उपस्थित होते.