गुणाले तलावाच्या स्वच्छतेबाबत महापालिका आयुक्त नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:19 AM2021-03-10T01:19:30+5:302021-03-10T01:19:42+5:30
घणसोलीत पाहणी दौरा : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता दूर करण्यासाठी पाठपुरावा करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ला सामोरे जाताना स्वच्छता आणि सुशोभीकरणाद्वारे नवी मुंबई शहराचे स्वरूप अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्वच्छता कार्याची पाहणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी घणसोली विभागामधील विकसित नोड, गांव - गावठाण, झोपडपट्टी तसेच एम.आय.डी.सी. क्षेत्र अशा सर्व भागांत फिरून केली. नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये याकरिता नाल्यांच्या काठावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या रस्त्यांपासून काहीशा वर असल्यामुळे त्यामध्ये असलेले अंतर भरून काढावे, असे निर्देश दिले.
घणसोलीतील गुणाले तलावाचा जलाशय तितकासा स्वच्छ नाही. तसेच त्याशेजारील कंपोस्ट पिट कार्यान्वित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. घणसोली विभागाच्या विकासाला सर्वांत शेवटी सुरुवात झाली असल्याने तेथील विकास प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सिडकोचे भूखंड पडून आहेत. अशा मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी सिडकोकडे सुरू असलेला पाठपुरावा अधिक तीव्रतेने करून हे भूखंड स्वच्छ करून घ्यावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. रबाळे एम.आय.डी.सी. भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते, पदपथ यांची कामे सुरू असून अनेक ठिकाणी आच्छादनाच्या हिरव्या जाळ्या दिसून येत नाहीत, याबाबत संबंधितांकडून तातडीने कार्यवाही करून घ्यावी व त्या ठिकाणचे डेब्रिजही व्यवस्थित ठेवले जावे, असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे एम.आय.डी.सी. क्षेत्रात मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी पडलेले बांधकाम व पाडकाम डेब्रिज उचलण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यामध्ये उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार, घणसोली विभागाचे सहायक आयुक्त संजय तायडे आणि स्थापत्य विभागाचे उप अभियंता रमेश गुरव उपस्थित होते.
नवी मुंबईकरांनी तसेच एम.आय.डी.सी. क्षेत्र व इतर ठिकाणी व्यवसाय व कामानिमित्त येणाऱ्या इतर शहरात राहणाऱ्यांनी नवी मुंबई शहराचा स्वच्छ व सुंदर नावलौकिक वाढविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे.
- अभिजित बांगर,
नवी मुंबई महापालिका आयुक्त.