नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७३वा वर्धापन दिन नवी मुंबई शहरात उत्साहात संपन्न झाला. कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून महापालिका, कोकण भवन, सोसायट्या आदी सर्वच ठिकाणी नियमांचे पालन करून स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. महापालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना योद्ध्यांचे विशेष आभार मानत, प्रत्येक नागरिकाने ‘मी पण कोविड योद्धा’ या भूमिकेतून योगदान देण्याचे आवाहन केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन साजरा करताना, आपण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक यांना अभिवादन करतो, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमेवर तैनात असणारे जवान सैनिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून जे आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असे डॉक्टर्स, नर्सेस, इतर अनेक विभागांचे अधिकारी- कर्मचारी, महानगरपालिका, पोलीस, महसूल, तसेच समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमे या सर्वांनी कोविड योद्धा म्हणून योगदान दिलेले आहे, त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत, असे मत आयुक्त बांगर यांनी मांडले. या सर्वांच्या अथक योगदानाच्या माध्यमातून आपण सारेजण कोविडवर मात करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती बाळगून आहोत, असे ते म्हणाले. या सर्व घटकांचे आभार व्यक्त करीत असताना, बांगर यांनी कोविड योद्ध्याची व्याख्या केवळ या घटकांपुरती मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाने कोविड विरुद्धच्या लढाईमधील आपली जबाबदारी ओळखून ती स्वीकारणे अपेक्षित आहे, अशी संकल्पना मांडली.प्रत्येक नागरिकाने ‘मी पण कोविड योद्धा’ ही भूमिका अंगीकारली आणि कोविडचा सामना करताना नियमित स्वच्छ हात धुणे, नेहमी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, लक्षणे जाणवल्यास न लपवता आपली मोफत अँटिजेन टेस्ट करून घेणे अशा प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन केले, तर आपण नक्की या कोरोनाच्या संकटावर मात करू, असा विश्वास आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अग्निशमन जवान व नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उपस्थित होते. कोकण विभागीय महसूल आयुक्त लोकेश चंद्र यांच्या हस्ते कोकण भवन प्रांगणात ध्वजारोहण झाले. शासनाच्या सूचनांनुसार मास्क आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. या समारंभाप्रसंगी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सोसायट्यांमध्येही मास्क, डिस्टन्सिंगचे पालन करीत ध्वजारोहण सोहळा झाला.>विद्यार्थ्यांसाठीआॅनलाइन कार्यक्रमध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी शाळांची मैदाने विद्यार्थ्यांनी गजबजलेली असतात; परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. महाविद्यालय, शाळामध्ये झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनाही सोहळ्याचा आनंद घेता यावा, यासाठी शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या वतीने आॅनलाइन ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.>कोकण विभागाचे फेसबुक लाइव्हसीबीडी येथील कोकण भवन येथे संपन्न झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याचा नागरिकांना घरबसल्या आनंद घेता यावा, यासाठी विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग या कार्यालयाच्या फेसबुक अकाउंटवरून थेट प्रेक्षपण करण्यात आले.>आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहणकोरोनाकाळात न डगमगता नागरिकांना आरोग्य सेवा देणाºया कोविड योद्ध्यांना सन्मानित करण्याच्या अनुषंगाने सानपाडा सेक्टर १३मधील शिवमंदिरी सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आलेला ध्वजारोहण सोहळा महापालिकेच्या सानपाडा येथील नागरी आरोग्य केंद्रातील नर्स (ए.एन.एम.) ज्योती पिंगळे यांच्या हस्ते पार पडला. कोविड योद्धा म्हणून त्यांचा सोसायटीच्या माध्यमातून सन्मानही करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश साटम आदी उपस्थित होते.
पालिका आयुक्तांनी मानले कोरोना योद्ध्यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 1:10 AM