नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी, फळ व कांदा मार्केटला मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी अचानक भेट दिली. मार्केटमधील वस्तुस्थितीचा आढावा घेऊन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नवी मुंबईमधील कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश आहे. येथील पाच मार्केटमध्ये प्रतिदिन ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती असते. एपीएमसी मार्केटमध्ये सूचनांचे किती पालन होते हे पाहण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी अचानक मार्केटला भेट दिली. कांदा-बटाटा मार्केट, भाजीपाला व फळ मार्केटमधील विविध विंगमध्ये फेरफटका मारून तेथील वस्तुस्थितीची माहिती घेतली.बाजार समितीमध्ये काही कामगार व इतर घटक मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दंड वसूल करणे हा कारवाईमागील उद्देश नसून शिस्त लागणे आवश्यक आहे. या वेळी एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, मनपाचे उपआयुक्त दादासाहेब चाबूकस्वार आदी अधिकारी उपस्थित होते.