नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवांपैकी २८ लोकसेवा ऑनलाईन दिल्या जात असून उर्वरित लोकसेवाही ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी व याबाबतचे सादरीकरण विभागप्रमुखांच्या पुढील बैठकीत सादर करावेत असे निर्देश नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले. महापालिकेच्या बांधून तयार असलेल्या इमारती वापरात आणण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देशित करीत मालमत्ता अभियांत्रिकी विभागाने संबंधित समन्वय साधून सदर इमारती बांधलेल्या प्रयोजनासाठी कार्यान्वित होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
बांधून तयार असलेली मार्केट्स वापरात आणण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी मार्केट इमारतींचा विभागनिहाय आढावा घेतला व नोंदणीकृत फेरीवाले मार्केटमध्ये बसून व्यवसाय करतील यादृष्टीने प्रभावी प्रयत्न करावेत असे सूचित केले. त्याचप्रमाणे घणसोली येथील रात्र निवारा केंद्र, सीवूड्स येथील पाळणाघर तसेच ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशित केले. या बैठकीमध्ये आयुक्तांनी विविध विभागांमार्फत सुरु असलेल्या तसेच नियोजित कामांचा बाबनिहाय सविस्तर आढावा घेतला. यामध्ये लिडार सर्वेक्षण कामाला गती देऊन हे काम तत्परतेने करणेबाबत कालबध्द आखणी करावी असे निर्देश दिले. त्यालाच समांतरपणे मालमत्ताकर विभागाने प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन पडताळणी करण्याचे सूचित केले.
कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्क अधिक माहितीपूर्ण नव्या स्वरुपात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार असून त्याबाबतची कार्यवाही गतीमानतेने करावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. घणसोली सेंट्रल पार्क येथील जलतरण तलावाचे काम जलद पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले. नेरुळ अग्निशमन केंद्र तसेच कोपरखैरणे येथील दोन नागरी आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक कर्मचाऱ्यांचे नियोजन करावे असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी पशुवैदयकीय रुग्णालय सुरु करण्याबाबतही कार्यवाही तत्परतेने करण्याच्या सूचना दिल्या. पीएम स्वनिधी बाबतचे काम अधिक प्रभावी व गतीमान होण्याची गरज विशद करीत आयुक्तांनी याबाबत बँकांची बैठक बोलविण्याचे सूचित केले. याशिवाय इतर विभागांमध्ये सुरु असलेल्या कामांचा व सेवांचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या पुढील बैठकीत आज दिलेल्या सूचनांनुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे निर्देशित केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
मराठी देवनागरी भाषेतील नाव मोठया आकारात असावे
मराठी पाटयांबाबत विभाग कार्यालयांमार्फत आपापल्या क्षेत्रात व्यावसायिक व आस्थापनांना नोटीसा देण्यास सुरुवात झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती आयुक्तांना देण्यात आली. यावर पाटयांमध्ये मराठी देवनागरी भाषेतील नाव सर्वात मोठया आकारात असावे याची माहिती दुकानदारांना देऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.