नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या विविध मागण्यांसाठी समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून महापालिकेच्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांनी बुधवार, ७ आॅगस्ट रोजी महापलिकेवर मोर्चा काढला. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी येत्या महासभेत प्रस्ताव पाठविण्याचे लेखी आश्वासन संघटनेला दिले असून, त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.घनकचरा, मलनि:सारण, पाणीपुरवठा आदी विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून विविध मागण्या केल्या जात आहेत; परंतु मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी महापालिकेवर धडक दिली. या वेळी अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे १४ महिन्यांची थकबाकी कामगारांना त्वरित वाटप करण्यात यावी. कचरा वाहतूक कामगारांना ४३ महिन्यांच्या थकबाकीचे वाटप करावे. कामगारांचे वेतन जिओ फेन्सिंग वॉच आणि बायोमॅट्रिक मशिनचा ताळमेळ घेऊन करण्यात यावे. या तीन प्रमुख मागण्यांसाठी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी महापालिका आयुक्त मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेत, या बाबतचा प्रस्ताव तयार असून येत्या महासभेत प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन संघाच्या पदाधिकाºयांना दिले. त्यानंतर तूर्तास मोर्चा मागे घेण्यात आला असल्याचे समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी सांगितले.
महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा महापालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:06 AM