निष्काळजीपणा करणाऱ्या चौघांवर महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:55 PM2019-04-18T23:55:12+5:302019-04-18T23:55:17+5:30
निष्काळजीपणा करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई : निष्काळजीपणा करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मनपा रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोन डॉक्टरांना व वाशी पूल दुर्घटनेप्रसंगी दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जावर अधिकाºयांचे लक्ष नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. काम सुरू असलेल्या ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास येत असते. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयामध्येही रुग्णांच्या उपचाराकडे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या.
२८ मार्चला तुर्भेमध्ये राहणाºया विकी इंगळे या तरुणाला उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे इंगळे याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप मृत तरुणाचे वडील राजेंद्र इंगळे यांनी केला होता. निष्काळजीपणाला जबाबदार असणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. कारवाईसाठी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वैद्यकशास्त्रतज्ज्ञ डॉ. शरीफ हुसेन तडवी व डॉ. प्रभा नंदकिशोर सावंत यांना गुरुवारी निलंबित केले आहे.
वाशी सेक्टर ८ ए व १० ए मधील पादचारी पूल ११ एप्रिलला रात्री कोसळला. या अपघातामध्ये सर्वेश पाल व जितेंद्र पाल हे दोघे जखमी झाले. यामधील सर्वेश याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर फोर्टिज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पुलाच्या दुरुस्तीसाठी एका महिन्यापूर्वीच ठेकेदाराला कार्यादेश दिले होते. होल्डिंग पॉण्ड व वॉक वे लगत स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग बसविणे व दुरुस्त करण्यात येणार आहेत. संबंधित ठेकेदाराने व या विभागामधील अधिकाºयांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठीची योग्य खबरदारी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, यामुळे पूल कोसळून दोन जण जखमी झाले. या प्रकरणी वाशी विभागामधील उप अभियंता यशवंत श्रीरंग कापसे व कनिष्ठ अभियंता विशाल संग्रामसिंग सूर्यवंशी या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामधील अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा केला व त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. कर्तव्यामध्ये कसूर करणाºयांना पाठीशी घातले जाणार नसल्याचे आयुक्तांनी या कारवाईमधून स्पष्ट केले आहे.
>चौकशीचे आदेश
वाशी पूल दुर्घटनेप्रकरणी वाशी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचीही खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णालयातील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी प्रथम संदर्भ रुग्णालय वाशीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
>ठेकेदारावर गुन्हा दाखल
पुलाच्या दुरुस्तीचे कार्यादेश दिल्यानंतर ठेकेदाराने योग्य काळजी घेतली पाहिजे होती. तत्काळ पुलाचा वापर थांबविणे आवश्यक होते. पुलाच्या दोन्ही बाजूचे मार्ग बंद करणे आवश्यक होते; परंतु ठेकेदाराने योग्य खबरदारी घेतली नसल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.
>आयआयटीकडून तपासणी होणार
वाशीमधील पुलाच्या दुरुस्तीचे आदेश ८ मार्चलाच देण्यात आले आहेत; परंतु पूल पूर्णपणे धोकादायक झाला असून वापरण्यायोग्य नाही. यामुळे मुंबई आयआयटीकडून पुलाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नवीन पुलाचे बांधकाम होईपर्यंत त्याचा वापर होऊ दिला जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
>रुग्णालयात निष्काळजी सुरूच
महापालिका रुग्णालयामध्ये उपचारामध्ये निष्काळजीपणा केला जात आहे. तुर्भेमधील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही येथील डॉक्टर व कर्मचाºयांमधील निष्काळजीपणा कमी झालेला नाही. गुरुवारी उपचारासाठी गेलेल्या एका रुग्णाचा रक्तदाब न तपासता उपचारासाठीच्या केसपेपरवर अंदाजे रक्तदाब लिहिल्याचे उघड झाले. रुग्णाने निदर्शनास आणून दिल्यानंतर असे चालतेच असे उत्तर देण्यात आले.