कोपरीमधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई
By admin | Published: May 7, 2017 06:27 AM2017-05-07T06:27:28+5:302017-05-07T06:27:28+5:30
महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी फेरीवाले व मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी वाशी आणि कोपरी परिसरातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. याअंतर्गत तीन बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी शहरातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देेश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय स्तरावर कारवाईचा धडका सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी वाशी व कोपरखैरणे विभागाच्या संयुक्त विद्यामाने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. याअंतर्गत पंधरा पक्की बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. तर कोपरी परिसरातील तीन धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीष पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी आणि वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.