महापालिकेनेच उडवला स्वच्छतेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:00 AM2019-06-14T02:00:52+5:302019-06-14T02:01:11+5:30
तोडलेले झाड पडून : डेब्रिजचे ढिगारेही उचलण्यास दिरंगाई
कळंबोली : पनवेल बसस्थानकासमोरील अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीतील गाळ्यावर महापालिकेने आठवडाभरापूर्वी हातोडा मारला. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पत्राही लावण्यात आला. मात्र, कारवाईदरम्यान येथील ४० वर्षे जुने झाड तोडण्यात आले. त्याच्या फांद्या अद्याप उचलण्यात आलेल्या नाहीत. पावसामुळे पालापाचोळा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बसस्थानका समोरील झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळ्यांवर महापालिका आयुक्तांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने २९ मे राजी कारवाई केली. अतिक्रमण तोडल्याने रस्ता रुंद झाला आहे. मात्र, कारवाई दरम्यान ४० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड तोडण्यात आले आहे. तोडलेले झाड बसस्थानक शेजारी सुशोभीकरण करण्यात आलेल्या जागेवर टाकण्यात आले आहे. १५ दिवस झाले तरी तोडलेले झाड उचलण्याचे काम महापालिकेने केले नाही, त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला आहे. ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ असा संदेश लिहिलेल्या जागेवरच झाडांच्या फांद्या व सुकलेली पाने पडली आहेत. सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पालापाचोळा कुजल्याने दुर्गंधी सुटली आहे. एकीकडे महापालिका महास्वच्छता अभियान राबवते आहे आणि दुसरीकडे अशाप्रकारे स्वच्छतेचा बोजवारा स्वत:च उडवते आहे. लवकरात लवकर या ठिकाणची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
डेब्रिजही जैसे थे
च्शिवाजीनगर येथील झोपडपट्टीमधील व्यावसायिक गाळेही महापालिकेने तोडले; पण त्याचे डेब्रिज तेथेच पडून आहे.
च्कारवाईला १५ दिवस उलटले तरी महानगरपालिकेने डेब्रिजचे ढीग उचलण्यास दिरंगाई केली आहे. याकडेही महापालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.