नवी मुंबई - श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबई पालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ११९५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. एलबीटी कर विभागाने प्रथमच एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून ११९५ कोटी रुपये महसूल संकलित केला असून मालमत्ता कर विभागाने ५३७ कोटी रूपये संकलित केले आहेत.नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर विशेष लक्ष दिले होते. उत्पन्न वाढ करण्याबरोबर योग्य त्या प्रकल्पावर खर्च करण्यावर भर दिला आहे. अनावश्यक कामे न करण्याच्या भूमिकेमुळे पालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच २ हजार कोटी रूपयांच्या ठेवी ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे. पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मालमत्ता व एलबीटी या दोन विभागांवर विशेष लक्ष दिले होते. वर्षभर ग्राहकांना बिलांचे वेळेत वाटप करणे. कर वसुलीचा नियमित आढावा घेणे यामुळे १९९५ पासून प्रथमच आर्थिक वर्षामध्ये १७३२ कोटी रूपये कर संकलित करण्यात यश आले आहे. गतवर्षी एलबीटी विभागाने ८८३ कोटी रूपयांची वसुली केली होती. या आर्थिक वर्षामध्ये पालिकेच्या तिजोरीमध्ये ११९५ कोटी रूपये जमा झाले आहेत. पहिल्यांदाच एक हजार कोटीचा टप्पा एलबीटी विभागाने ओलांडला आहे. मालमत्ता कर विभागानेही ५३७ कोटींची वसुली केली आहे.मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्याचे आव्हान पालिकेसमोर उभे राहिले आहे. औद्योगिक वसाहतीमधील वसुलीसाठी बँक खाती सील करण्याची व कंपन्यांना सील करण्याची कडक कारवाई करता येत नाही. अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या समस्यांनंतरही आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड व त्यांच्या टीमने मालमत्ता कर वसुलीही समाधानकारक केली आहे. मार्च महिन्यामध्ये १०५ कोटीची वसुली झाली आहे.एका महिन्यात प्रथमच एवढी वसुली झाली आहे. मालमत्ता कर विभागाने शेवटच्या महिन्यामध्ये थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशे वाजविण्यास सुरवात झाली होती. पालिकेचा हा प्रयोग यशस्वी झाला असून शेवटच्या महिन्यात विक्रमी वसुली होवू शकली आहे.वर्षभर कर वसुलीचे चांगले नियोजन केले होते. नियमीत आढावा घेण्यात येत होता. एलबीटी व मालमत्ता कर विभागातील सर्वांनी केलेल्या परिश्रमामुळे विक्रमी कर संकलन करणे शक्य झाले. शेवटच्या महिन्यात १०० कोटीपेक्षा जास्त वसुलीत यश आले आहे.- रामास्वामी एन.,आयुक्त महापालिकाआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एलबीटी व मालमत्ता कर विभागाकडून कर संकलनासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. यामुळेच कर संकलीत करण्यात यश आले.- धनराज गरड,मुख्य लेखा व वित्त अधिकारी
महापालिकेने केली १७३२ कोटींची विक्रमी करवसुली, मालमत्ताकर ५३७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 6:56 AM