नियम तोडणाऱ्यांवर पालिकेची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:28 AM2020-11-26T00:28:10+5:302020-11-26T00:28:31+5:30
एका आठवड्यात ९ लाख दंड वसूल
नवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. नियम तोडणाऱ्या कोणाचीही गय केली जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. गत एक आठवड्यात तब्बल ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंड वसुली हे उद्दिष्ट नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. नवी मुंबईमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. नवीन रुग्ण व मृत्यूची संख्या वाढत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.
शिल्लक रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असून अशीच स्थिती राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शहरवासीयांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क न वापरणाऱ्यांकडून ५०० रुपये, साेशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास दुकानदारांवर २ हजार आणि ग्राहकांकडून २०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड घेतला जाणार आहे. दुसऱ्यांदा नियम तोडल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाणार आहे.
नागरिकांमध्ये नियमांचे पालन करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु अनेक जण नियम धाब्यावर बसवत आहेत. मार्केट, दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये व पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
कारवाईसाठी विशेष पथके
महानगरपालिकेने प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून भाजी मार्केट, हॉटेल, चहाचे स्टॉल्स व गर्दी होणाऱ्या इतर ठिकाणीही लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे.
१३ ते २३ नोव्हेंबरदरम्यानच्या कारवाईचा तपशील
विभाग मास्क दुकानदार नागरिक
बेलापूर १ लाख २५ हजार ३८ हजार ५४ हजार ६००
नेरुळ ४४ हजार ५०० १० हजार ४५ हजार ३००
वाशी १ लाख ३६ हजार १३ हजार ८००
तुर्भे ५८ हजार २ हजार ३२ हजार ४००
कोपरखैरणे ९६ हजार - ५२ हजार
घणसोली ३५ हजार ४ हजार १६ हजार
ऐरोली ५१ हजार ५०० १४ हजार ६०० ८ हजार ४००
दिघा २३ हजार १ हजार ४०० २६ हजार ८००