लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई मोहीम तीव्र केली आहे. याअंतर्गत शहरातील सरसकट सर्वच बेकायदा बांधकामांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रहिवाशांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांची भेट घेऊन नोटिसा न पाठविण्याच्या सूचना केल्या. महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात कंबर कसली आहे. त्याअंतर्गत अनेक बांधकामांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ऐन पावसाळ्यात कारवाईच्या नोटिसा प्राप्त झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यात निवासी वापर होत असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्याचे शासनाचे धोरण आहे. असे असतानाही महापालिकेने नोटिसा पाठविण्याचा धडका लावल्याने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेक रहिवाशांनी आपल्या राहत्या घरासमोर पावसाळी शेड उभारले आहेत. तसेच बहुतांशी इमारती व घरे निकृष्ट झाली आहेत. राहण्यास धोकादायक आहेत. या इमारती, घरे व झोपड्यांचे पावसापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने रहिवाशांनी तात्पुरते शेड उभारले आहेत. अशा शेड्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेची ही मोहीम अयोग्य असून, या नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली. त्यानुसार पावसाळ्यात कोणत्याही बांधकामांना नोटिसा दिल्या जाणार नाहीत. यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना केल्या जातील, असे आयुक्त एन. रामास्वामी यांनी स्पष्ट केल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, भाजपाचे डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, कृष्णा पाटील माजी नगरसेवक संपत शेवाळे, नगरसेवक सुनील पाटील, दीपक पवार आदी उपस्थित होते.
बेकायदा बांधकामांना महापालिकेच्या नोटिसा
By admin | Published: June 28, 2017 3:32 AM