नवी मुंबई : अनंत चतुर्थीच्या अनुषंगाने शहरातील कृत्रिम, तसेच मूळ विसर्जन तलावांवर यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. मागील दहा दिवसांत एकूण १९,५७६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. मंगळवारीही मोठ्या भक्तिभावनेने गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने पालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे, तर अनेक मंडळांनी यंदाचा उत्सव रद्द केला आहे. शिवाय घरगुती गणेशोत्सवाला देखील मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, याकरिता यंदा प्रथमच पालिकेने प्रत्येक नोडमध्ये कृत्रिम विसर्जन तलाव तयार केले आहेत. त्या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येलाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत, तर विसर्जन मिरवणुकांना पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.विसर्जन स्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये नागरिकांना सोयीचे ठरेल, अशा १३५ ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात आली. राहत्या परिसरातच ही सोय झाल्याने नागरिकांनी २२ पारंपरिक विसर्जन स्थळांपेक्षा या कृत्रिम विसर्जन स्थळांना अधिक पसंती दिल्याचे मागील दहा दिवसांत दिसून आले. यानुसार, दीड, पाच, गौरीसह सहा व सातव्या दिवसांच्या ४ अशा २३ पारंपरिक विसर्जन स्थळांवर ८,८९४ श्रीगणेशमूर्तींचे, तसेच १३५ कृत्रिम विसर्जन स्थळांवर १०,६८२ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी दिनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रीगणेशमूर्ती विसर्जन होत असतात. त्यात सार्वजनिक मंडळांसह घरगुती मूर्तींचाही समावेश असतो. तेव्हा सर्वच ठिकाणी विशेष काळजी घेण्यात येत आहे.महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर स्वयंसेवक, लाइफगार्ड्स व्यवस्था आहे. त्या सोबतच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत करण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेचेही विसर्जन स्थळावरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे.नागरिकांना आवाहन : कृत्रिम विसर्जन स्थळांसह सर्व विसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार नाहीत. त्यामुळे शहरवासीयांचे आकर्षण असलेली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गणेशमूर्तींवर होणारी पुष्पवृष्टी रद्द करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशी दिनी होणाºया विसर्जन सोहळ्याकरिता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यामार्फत संपूर्ण दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी गर्दी टाळून, तसेच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर असे आरोग्यभान ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
अनंत चतुर्थीसाठी पालिका, पोलीस प्रशासन सज्ज, नवी मुंबईमधील विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 1:24 AM