नववर्षात कंत्राटी कामगारांना महापालिकेने दिली भेट, सहा हजार कामगारांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 02:46 AM2020-01-25T02:46:06+5:302020-01-25T02:46:43+5:30
महानगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांना १३ महिन्यांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
नवी मुंबई : महानगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांना १३ महिन्यांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ७३ कोटी ११ लाख १७ हजार रुपये देण्याच्या ४६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तब्बल सहा हजारपेक्षा जास्त कामगारांना याचा लाभ होणार असून, नवीन वर्षाची भेट मिळाल्यामुळे कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका साफसफाई, कचरा वाहतूक, उद्यान, विद्युत, शिक्षण व इतर विभागांमधील कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेत आहे. सद्यस्थितीमध्ये जवळपास ६,२७७ पेक्षा जास्त कामगार या विभागांमध्ये काम करत आहेत. कामगारांना किमान वेतनाची रक्कम कमी असल्यामुळे महापालिकेने समान कामास समान वेतन सुरू केले होते; परंतु शासनाने २०१५ मध्ये किमान वेतनामध्ये वाढ केली. पालिकेच्या समान वेतनापेक्षा किमान वेतनाची रक्कम जास्त असल्यामुळे कामगार संघटनांनी पुन्हा किमान वेतन मिळावे, यासाठी पाठपुरावा केला.
महापालिकेने मे २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करून किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला. शासनाने दिलेली मंजुरी व महापालिकेने प्रत्यक्षात केलेली अंमलबजावणी यामधील कालवधीमधील वेतनाचा फरक देण्यासाठी कामगारांनी पाठपुरावा केला होता. सर्वसाधारण सभेने आॅगस्ट २०१९ मध्ये किमान वेतनातील फरक देण्यासाठीच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली होती.
प्रशासकीय मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामगारांना त्याच्या लाभासाठी ९१ साफसफाई ठेकेदार, उद्यान व इतर सर्व विभागांमधील कामगारांना याचा लाभ देण्यासाठी ४६ प्रस्ताव तयार करण्यात आले. या प्रस्तावांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये कंत्राटी कामगारांचे योगदानही महत्त्वाचे आहे.
राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान व आता केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईने ठसा उमटविला असून, त्यामध्ये कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. यामुळे कंत्राटी कामगारांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून वेतनामधील १३ महिन्यांच्या फरकाची रक्कमही देण्यात येत आहे.
कामगारांना लवकरात लवकर ही रक्कम देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ठेकेदारांकडून पैसे देण्यास विलंब होतो, असेही काही लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे ठेकेदारांनी कामगारांची पिळवणूक करू नये,
असे मतही व्यक्त करण्यात आले
आहे.
कामगार संघटनांनीही प्रत्यक्षात कामगारांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर आम्ही आनंदोत्सव साजरा करू, असे स्पष्ट केले आहे. स्थायी समितीमध्ये हा विषय लवकर
यावा, यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनीही आग्रहाची भूमिका घेतली होती.
कंत्राटी कामगारांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. १३ महिन्यांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेऊन कामगारांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. लवकरात लवकर फरकाची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
- नवीन गवते,
स्थायी समिती, सभापती
कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करावे व वेतनातील फरक मिळावा, यासाठीही शिवसेनेने नेहमीच पाठपुरावा केला आहे. स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव लवकर घेण्यात यावा, यासाठीही आग्रही भूमिका घेतली होती. हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे आनंद होत आहे.
- रंगनाथ औटी,
नगरसेवक, शिवसेना