पालिकेने खरेदी केले ४० व्हेंटिलेटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:03 AM2020-10-03T00:03:14+5:302020-10-03T00:03:39+5:30
७५ आयसीयू बेड्स वाढविणार : नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय थांबणार
नवी मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने ४० व्हेंटिलेटर्स व ७५ आयसीयू बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या सुविधा कार्यान्वित होणार असून, त्यामुळे कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करता यावेत, यासाठी जवळपास ६ हजार बेडची सोय केली आहे, परंतु व्हेंटिलेटर्स व आयसीयू युनिट्सची कमतरता असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली होती. या दोन्ही सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे मृत्युदर कमी करण्यासही अडथळे येऊ लागले होते. ‘लोकमत’नेही याविषयी वारंवार आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले होते. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी याविषयी गांभीर्याने लक्ष देऊन ४० नवीन व्हेंटिलेटर्स खरेदी केले असून, ७५ आयसीयू युनिट्स वाढविण्याचा निर्णयही घेतला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात ३६५ आयसीयू युनिट्स होते. आता ही संख्या ४४० वर जाणार आहे. व्हेंटिलेटर्सची संख्या १३३ वरून १७३ होणार आहे. पालिकेने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाशी करार केला असून, नवीन व्हेंटिलेटर्स त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
आयुक्तांनी दिली गती : नवीन व्हेंटिलेटर्स लवकरच कार्यान्वित केले जाणार असल्याचेही असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
उपलब्ध बेडची संख्या
प्रकार क्षमता वापर शिल्लक
आयसीयू ३६५ ३२९ ३६
व्हेंटिलेटर्स १३३ ११९ १४
आॅक्सिजन बेड २११८ १००८ १११०
जनरल बेड ३३०८ १४७५ १८३३