अतिक्रमणावरील कारवाईला महापालिका सज्ज
By admin | Published: October 2, 2016 03:02 AM2016-10-02T03:02:10+5:302016-10-02T03:02:10+5:30
पावसाळा संपताच महापालिकेने अनधिकृत बांधाकामांच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या आणि तयार असलेल्या परंतु रहिवाशांचे वास्तव्य
नवी मुंबई : पावसाळा संपताच महापालिकेने अनधिकृत बांधाकामांच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या आणि तयार असलेल्या परंतु रहिवाशांचे वास्तव्य नसलेल्या ३00 बेकायदा बांधकामांची सुधारित यादी तयार करण्यात आली आहे. या बांधकामांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यातील बहुतांशी बांधकामे विस्तारित गावठाणातील असल्याने प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार त्यांनी दोन महिन्यापूर्वी गाव गावठाणांतील बेकायदा बांधकामांना नोटीसा बजावून कारवाई मोहिम हाती घेतली होती. परंतु स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या कारवाईला तीव्र विरोध करीत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे शहरात आयुक्त मुंढे विरूध्द प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण झाला होता. शेवटी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने राज्य सरकारने पावसाळ्यापर्यंत या कारवाईला स्थगीती दिली होती. परंतु ३0 सप्टेंबर रोजी ही मुदत संपत आहेत. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांविषयी राज्य सरकारकडून अद्यापी कोणतेही धोरण निश्चित झालेली नाही. त्यामुळे सध्या २0१५ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यानुसार ३00 बांधकामांची सुधारित यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्या टप्याने त्यावर कारवाई करण्याची महापालिकेची योजना असल्याचे समजते. विशेष म्हणजे यातील बहुतांशी बांधकामे विस्तारित गावठाण क्षेत्रातील आहेत. त्यामुळे या कारवाईला प्रकल्पग्रस्तांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)