सार्वजनिक सुविधांच्या ८८ आरक्षणांवर महापालिकेने सोडले पाणी
By नारायण जाधव | Published: February 23, 2024 07:19 PM2024-02-23T19:19:52+5:302024-02-23T19:20:10+5:30
सिडकोच्या दबावापुढे महापालिका झुकली : पुनर्विकासासाठी सुविधा
नवी मुंबई : स्थापनेपासून जवळपास ३३ वर्षांनंतर प्रथमच नवी मुंबई महानगरपालिकेने आपला विकास आराखडा अंतिम मंजुरीकरीता शासनास गुरुवारी सादर केला. नव्या आराखड्यात सिडकोच्या विनंतीवरून त्यांनी विक्री/वितरण केलेल्या भुखंडावरील आरक्षणे महापालिकेने मागे घेतली आहेत. यामुळे प्रारूप विकास योजनेत प्रस्तावित केलेल्या ६२५ आरक्षणांची संख्या ५३७ वर आली आहेत. सार्वजनिक सुविधांसाठीची तब्बल ८८ भूखंडांवरील आरक्षणे रद्द केल्याने त्याचा परिणाम आगामी काळात शहराच्या सामाजिक स्वास्थावर होणार आहे.
विकास आराखड्यासाठी १० ऑगस्ट २०२२ रोजी सुचना प्रसिद्ध केली होती. तीवर हरकतींवर सुनावणी घेण्याकरीता शासनाने गठीत केलेल्या नियोजन समितीने सुनावणी घेऊन आपला आयुक्तांना १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासक तथा आयुक्तांना सादर केला होता. तो नवी मुंबई महानगरपालिकेने पुढील कार्यवाहीकरीता शासनास केला आहे.
प्रारूप विकास योजनेत केलेले प्रस्तावित बदल
- प्रारूप विकास योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खाजगी जमिनी ह्या भागश: ऐरोली, भागश: दिघा, भागश: इलठण, भागश: बोरिवली व अडीवली, भूतवली या महसूली गावातील क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन केलेले नव्हते. आता या क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन करून त्यामध्ये रस्त्याचे जाळे, सार्वजनिक सोयीसुविधा करीता आवश्यक असलेले भूखंड आरक्षित केले असून, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सदर क्षेत्रातील जमिन मालक हे ह्या जमिनींच्या विकासापासून वंचित होते. अशा सर्व जमिन मालकांना विकास योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर दिलासा मिळून विकासास चालना मिळणार आहे.
- नवी मुंबई शहरामध्ये खेळाच्या अनुषंगाने चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देता याव्यात या अनुषंगाने चटईक्षेत्र निर्देशांकामध्ये ०.५ इतक्या मर्यादेपर्यंत वाढ सुचविलेला आहे.
- सिडकोने विकसित केलेल्या शाळा आता धोकादायक झालेल्या असून सदर शाळेंच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने क्रीडांगण व शाळेच्या भूखंडामध्ये अदलाबदल करून बांधकाम अनुज्ञेय व्हावे याबाबत तरतूद केली आहे.
- सिडको विकसित इमारतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने कंडोमिनिअममधील रस्ते व इतर सार्वजनिक सुविंधांच्या आखणीमुळे पुनर्विकासाच्या नियोजनास बाधा येत असल्याने याकरिता कंडोमिनिअममधील सार्वजनिक सोयीसुविधांच्या अभिन्यासाच्या पुनर्रचनेबाबत तरतूद प्रस्तावित केली आहे.
- सिडको विकसित इमारतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने आवश्यक खुल्या क्षेत्राबाबत नियमावलीतील तरतूद क्र.३,४,१ अन्वये खुले क्षेत्र अनुज्ञेय होणेबाबत तरतूद केलेली आहे.
लहान मुलांसाठी बेलापूर, नेरूळमध्ये मैदाने
- प्रारूप विकास योजनेमध्ये लहान मुलांना खेळण्याकरीता स्वतंत्र खेळाच्या मैदानाची आवश्यकता विचारात घेऊन लहान मुलांच्या खेळाच्या मैदानाकरीता बेलापूर , सेक्टर-२१/२२, नेरूळ, सेक्टर-२ व सेक्टर-८ या ठिकाणी एकूण ९३ आरक्षणे केवळ लहान मुलांच्या खेळण्याकरीता Childrens Play Ground असे आरक्षण प्रस्तावित केली आहेत.
पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी
- नवी मुंबई क्षेत्रामध्ये पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराकरीता नेरूळ एमआयडीसीमध्ये आरक्षण प्रस्तावित करण्यात केले आहे. अशा प्रकारची पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्काराकरीता स्वतंत्र स्मशानभूमी / व्यवस्थेकरीता आरक्षण प्रस्तावित करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव महापालिका असावी.
रस्ते होणार रुंद
- सिडको विकसित इमारतींच्या पुनर्विकासाकरीता नवीन नियमावलीनुसार आवश्यक रूंदी उपलब्ध होणाच्या अनुषंगाने नियोजनाच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रूंदीकरण प्रस्तावित केलेले आहे.
· नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास योजना प्रसिद्ध होण्यापूर्वी सदर क्षेत्राचे नियोजन हे सिडकोने केलेले असल्याने सिडकोच्या अद्यावत नोडल नकाशाची तुलना करता प्रारूप विकास योजनेच्या प्रस्तावामध्ये ज्या ठिकाणी जलाशय, Tree Belt, Power Coridoor दर्शविण्यात आलेला होता अशा ठिकाणी सिडकोच्या अद्यावत नोडल नकाशानुसार त्याप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.