नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. विधवा,घटस्फोटीत महिलांची मुले, दगडखाण, नाका कामगारांची मुले व इतर प्रवर्गांसाठी ही योजना असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यावर्षी ८ फेब्रुवारीपासून या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. शिष्यवृत्तीविषयी सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजना कोणासाठी असणार आहे. कोणती कागदपत्र सादर केली जाणार याविषयी सविस्तर माहितीचा यामध्ये समावेश आहे. www.schemenmmc.com या संकेतस्थळावर ही माहिती असून योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे.
८ ते २८ फेब्रुवारीपर्यंत यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले असून योजनेची माहिती सर्व शहरवासीयांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृतीही सुरू केली आहे.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला होणार
विधवा, घटस्फोटीत महिलांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती.आर्थिक दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागसवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी.महानगरपालिका अस्थापनेवरील सफाईकामगार व कंत्राटी कामगारांच्या मुलांसाठी.दगडखाण, रेती, बांधकाम, नाका कामगारांच्या मुलांसाठी.
कागदपत्र काय लागणार
८ लाख पेक्षा कमी उत्पन्न असल्याचा तहसिलदारांचा दाखला.वास्तव्याचा पुराव्यासाठी मालमत्ता कर भरणा पावती, निवडणूक ओळखपत्र, पाणीपट्टी, वीजबील, भाडेकरार, रेशनकार्ड, आधारकार्ड, गॅस कनेक्शन, बॅंकेचे पासबुकपैकी कोणतेही एक.विद्यार्थ्यांचे मागील वर्षातील गुणपत्रिका.मागासरवर्गीय असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांकडून दाखला.पतीच्या मृत्यूचा किंवा घटस्फोटाविषयी आदेशाची प्रत.प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचा अवार्ड कॉपी व इतर माहिती.सफाई कामगार, नाका कामगार, खाण कामगार असल्याविषयीचा पालकांचा पुरावा.राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचे पासबुक.पाल्याचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आधार लिंक असणे आवश्यक.