शिळफाटा परिसरातील चौदा गावांना पुन्हा महापालिकेचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:13 AM2018-02-22T02:13:12+5:302018-02-22T02:13:15+5:30
ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत
नवी मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत. ग्रामस्थांच्या विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने एप्रिल २००७ मध्ये ही गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र केली होती. आता पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, या दृष्टीने ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
डिसेंबर १९९१मध्ये ठाणे जिल्हा परिषदेतील ४५ गावांचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली. सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पात समावेश नसलेल्या पारसिक हिलच्या पलीकडील १४ गावांचा यात समावेश होता. त्यानुसार महापालिकेने दहा वर्षांत सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, माता बाल संगोपन केंद्र, नागरी आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळांची निर्मिती केली; परंतु महापालिका आपल्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेईल, या भीतीने सुविधा आणि कररचनेचा बाऊ करीत ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून महापालिकेतून ही गावे वगळण्याची मागणी केली. या मागणीसाठी रक्तरंजित संघर्ष करण्यात आला. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने ही गावे महापालिकेतून वगळून ती स्वतंत्र केली. त्यामुळे या गावांचा कारभार पुन्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू झाला. असे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपेक्षित विकास साधला जात नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू आहे. १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. या मागणीसाठी आता ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.
मागील काही वर्षांत १४ गाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या अपुºया उत्पन्नातून या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यास मर्यादा येत आहेत. पाणीपुरवठा, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रश्न गंभीर बनले आहेत. गावातील शासकीय गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा कार्यरत होणे आवश्यक आहे. त्यामुळेच ही १४ गावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी दहिसर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच चेतन गजानन पाटील, सदस्य गुरुनाथ मधुकर पाटील यांनी केली आहे.